Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारांमुळे तिन जनावरांचा जागीच मृत्यु



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : वरोरा तालुक्यातील वडधा तु. या गावाजवळील शेतात वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारांमुळे झालेल्या अपघातात १ बैल, १ गाय व १ वासरू अशा तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. वसंता घुघल या शेतकऱ्याच्या जनावरांचा या घटनेत बळी गेला असून, यामुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

काल दिनांक १६ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे गावाच्या शेजारील शेतात विद्युत वाहिन्यांच्या तारांवर झाडे पडून त्या तुटून जमिनीवर आल्या होत्या. गावकऱ्यांनी याची माहिती त्वरित चारगाव बु. येथील सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता व लाईनमन यांना वारंवार फोन करून दिली. मात्र, एम. एस. ई. बी.च्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून अख्खी रात्र वीजपुरवठा सुरूच ठेवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी वसंता घुघल हे आपल्या जनावरांना शेतात नेत असताना, अशोक मत्ते यांच्या शेतात पडलेल्या जिवंत तारेला स्पर्श होऊन त्यांच्या तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने इतर जनावरांना व वसंताजींना प्रसंगावधान राखल्यामुळे वाचवता आले.

गावकऱ्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत एम. एस. ई. बी.च्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. आधीच शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना अशा आकस्मिक नुकसानीने शेतकरी पुरता खचून गेला आहे.

घटनास्थळी वडधा तु.चे पटवारी पवार यांनी पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील प्रमोद लेडांगे, माजी सरपंच सुनील सातपुते, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पावडे, बाळकृष्ण डाहुले, मंगल बुरान यांच्यासह गावकरी उपस्थित होते. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डांगरे व बारेकर यांनी मृत जनावरांची तपासणी केली. शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी नितीन भैसारे व रजकुमार उकेटोयने यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या