चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित झालेल्या धुळे रेल्वे स्थानकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. अमृत भारत स्टेशन योजनेत पुनर्विकसित झालेल्या देशभरातील 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील बिकानेर येथून एका शानदार समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यात महाराष्ट्रातील धुळे रेल्वे स्थानकासह 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
धुळे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणात प्रवाशांसाठी अनेक सोयी व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मवरील नव्या फरश्या, नवीन सीओपी (फुटओव्हर ब्रिज), पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी शौचालये, व्हीआयपी कक्ष, जनरल वेटिंग हॉल, कमांडर वेटिंग रूम, नवीन बुकिंग ऑफिस, रेल्वे कर्मचारी कार्यालयांचे नूतनीकरण, घोषणा प्रणाली, कोच इंडिकेटर, ट्रेन माहिती फलक, साइनेज बोर्ड, स्टेशन साइन बोर्ड आदि सुविधांचा समावेश आहे, तसेच परिसरात बाग, कारंजे, रोषणाई, कंपाउंड वॉलची सजावट, नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन व जनरेटर आदी सुविधाही केल्या आहेत.
धुळे रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश होण्यासाठी धुळेचे तत्कालीन खासदार डॉ सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे स्थानकाचा या योजनेत समावेश झाला व केंद्र सरकाराने 9.13 कोटी रुपयांच्या निधीसह स्थानकाच्या पुनर्विकासास मंजुरी दिली होती. 26 फेब्रुवारी, 2024 ला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या कामाची पायाभरणी केली होती. पुनर्विकासानंतर या स्थानकाचे संपूर्ण रुप पालटले असून याठिकाणी प्रवाशांना सर्व सोईसुविधा उपलब्ध झाल्या आहे. आज या स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, डॉ. सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास आमदार अनुपभैय्या अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, रेल्वेचे अधिकारी अनुराग मेश्राम, धुळे स्थानकाचे प्रबंधक संतोष जाधव बापूसाहेब खलाणे, गजेंद्र अंपळकर यांच्यासह शालेय विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या