जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी; वंचित बहुजन आघाडीची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
यवतमाळ - सध्या यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य विभागात प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर काम सुरू असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यवतमाळच्य वतीने आज दिनांक २२ मे रोजी अकोला मंडळाच्या आरोग्य उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण जिल्हा आहे. येथे १६ तालुके असूनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद गेल्या काही काळापासून रिक्त आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडून केवळ औपचारिक जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर कुठलेही ठोस नियंत्रण राहिलेले नाही.
अलीकडेच उष्णतेच्या लाटेनंतर हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, जिल्ह्यात साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची उपस्थिती अपुरी असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा धोक्यात आली आहे. या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत, यवतमाळ येथे तात्काळ पूर्णवेळ व सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे, महासचिव शिवदास कांबळे, पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.
0 टिप्पण्या