Ticker

6/recent/ticker-posts

ॲड. आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सर्वांसाठीच कायदेशीर आधार मिळेल


- सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण

संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर देशभरात अस्वस्थता पसरली होती. न्यायालयीन कोठडीत झालेल्या या संशयास्पद मृत्यूमागील सत्य काय आहे, याचा पाठपुरावा करत त्यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. यामध्ये दोन महत्त्वाच्या बाबींवर न्यायालयाचे लक्ष केंद्रीत झाले असून, यामुळे केवळ सूर्यवंशी कुटुंबाला नव्हे, तर हजारो अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय मिळण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.

या प्रकरणात प्रखर आवाज उठवणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कायद्यातील अपूर्णतेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयीन कोठडीत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर तपासाची दिशा व प्रक्रिया स्पष्ट नाही, यावर त्यांनी ठामपणे बोट ठेवले. त्यावर कायदा असला पाहिजे, कायद्यातील तरतूद पूर्ण करा अशी मागणी आंबेडकरांनी केली. हे निरीक्षण म्हणजे फक्त सूर्यवंशी प्रकरणापुरते मर्यादित नसून, भविष्यातील शेकडो प्रकरणांमध्ये दिशादर्शक ठरणार आहे.

या सोबतच, या प्रकरणात SIT (विशेष तपास पथक) नेमण्याची मागणीही न्यायालयाने गांभीर्याने ऐकून घेतली आहे. कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाची चौकशी पुन्हा त्याच संस्थेने म्हणजे पोलिसांकडून केली जाणे ही नैतिक आणि प्रक्रियात्मक दृष्टीनेही अडचणीची बाब आहे. म्हणूनच, स्वतंत्र तपाससंस्थेची गरज ही आंबेडकरांची मागणी,  लोकशाहीव्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्वाची वाटते. 

या प्रकरणातील अंतिम आदेश लवकरच अपेक्षित असून, कायद्यातील सुधारणा आणि SIT नेमणूक 
 हे दोन्ही निर्णय केवळ न्यायप्राप्तीसाठी नव्हे, तर भारतातील न्यायालयीन कोठड्यांतील अन्यायग्रस्तांचा आवाज बनतील.

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बलिदानाचा अर्थ अशाच ऐतिहासिक निर्णयांतून उजळून निघतो. त्यांच्या कुटुंबाने घेतलेला हा कायदेशीर लढ्याचा मार्ग आणि त्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रभावी युक्तिवाद, हे देशभरातील नागरिकांना सांगून जातात की,अन्याय कितीही प्रस्थापित वाटला, तरी सत्य आणि संघर्षाच्या आधारावर न्याय मिळवता येतो. 

ही लढाई केवळ एका तरुणाची नव्हे, तर लोकशाहीच्या अस्तित्वासाठीची आहे. त्यामुळेच हा निर्णय म्हणजे केवळ एक न्यायालयीन आदेश न राहता, तो अनेकांना न्याय मिळवून देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा दृढ विश्वास बाळगायला हवा.

न्याय म्हणजे केवळ शिक्षा नव्हे, तर सत्याचा विजय असतो. आणि हा विजय आता जवळ आलाय.

- आकाश शेलार 
shelarakash702@gmail.com 
8788766631


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या