Ticker

6/recent/ticker-posts

वैराग येथे पडक्या वाड्यात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई; प्रोव्हिजन दारू जप्त


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-वैराग येथील वाणी गल्ली भागात असलेल्या एका पडक्या वाड्याच्या आडोशाला बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या इसमावर वैराग पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत टॅंगो पंच कंपनीच्या १५ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस नाईक १३८० शरद दादाराव कांबळे (वय ३४), यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे हे गेल्या तीन वर्षांपासून वैराग पोलिस ठाण्यात कार्यरत असून सद्यःस्थितीत वैराग शहर बीट अंमलदार म्हणून काम पाहत आहेत. दिनांक १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक गावडे यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक जाधवर (क्र. ४५०) आणि पोलीस शिपाई माळी (क्र. २१२७) यांच्यासह पेट्रोलिंग करत असताना वाणी गल्लीतील झंकार बॅन्जोच्या मागे असलेल्या पडक्या वाड्याजवळ एका इसमाकडून चोरीछुप्या पद्धतीने देशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली.

सदर माहितीच्या आधारे पंचासह पोलिसांनी छापा टाकला असता, एक इसम पिशवीसह बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने आपले नाव हनुमंत मधुकर कुंभार (वय २८, व्यवसाय - मजुरी, रा. संतनाथ गल्ली, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्याकडील कापडी पिशवीची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये टॅंगो पंच कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या १५ सीलबंद बाटल्या, प्रत्येकी ७० रुपये किंमतीच्या आढळून आल्या. एकूण जप्त दारूची किंमत १,०५० रुपये इतकी आहे.

पोलिसांनी त्याठिकाणीच हा प्रोव्हिजनचा माल जप्त केला. यामधून एका बाटलीचा नमुना सी.ए. तपासणीसाठी घेतला असून त्यावर पंच व पोलिसांचे स्वाक्षरीयुक्त लेबल लावण्यात आले आहे.

या गुन्ह्याची नोंद वैराग पोलीस ठाण्यात FIR क्र. ०१८९/२०२५, दिनांक १३/०६/२०२५ रोजी संध्याकाळी ७:४३ वाजता करण्यात आली असून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या