Ticker

6/recent/ticker-posts

'व्हॉइस ऑफ मीडियाचा अभिनव उपक्रम

 पत्रकारांच्या पाल्यांसाठी शालेय साहित्य वाटप'

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-समाजातील घटनांना सामोरे जात असताना २४x७ कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे योगदान मोठे असते. त्यांचं कर्तव्य जरी समाजासाठी असलं तरी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. याच जाणिवेतून 'व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम'च्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांचा गौरव करत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

बार्शीतील 'व्हॉइस ऑफ मीडिया'च्या राज्य कार्यालयात शुक्रवारी (दि. १२ जून) पार पडलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील १०० पत्रकारांच्या मुलांना सुमारे एक लाख रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ संघटनेपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण पत्रकार बांधवांच्या पाल्यांना केंद्रस्थानी ठेवून राबवला गेला. यामुळे या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

कार्यक्रमात सुयश विद्यालयाचे अध्यक्ष आणि निवृत्त शिक्षणाधिकारी शिवदास नलावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, "पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, पण तो आपल्या कुटुंबासाठीही वेळ द्यायला हवा. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पत्रकारांनी कौटुंबिक जबाबदारीदेखील पार पाडावी."

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी पालक व पाल्य यांच्यात मैत्रीपूर्ण नातं असण्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, "मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक आणि संवादात्मक वातावरण गरजेचे आहे."

राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी यावेळी सांगितले, "हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच अशा व्यापक स्वरूपात राबवला गेला आहे. पत्रकारांच्या कुटुंबातील मुले ही समाजाच्या सक्षम भविष्यासाठी बीज आहेत, आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप अलाट यांनी केले, तर आभार शाम थोरात यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश झिंगाडे, विजय शिंगाडे, समाधान चव्हाण, विक्रांत पवार, ओंकार हिंगमीरे, जमीर कुरेशी, अपर्णा दळवी यांच्यासह संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.

पत्रकारांवर समाजातील घडामोडींचं वृत्तांकन करण्याची जबाबदारी असली, तरी त्यांच्या मुलांचं शिक्षण, प्रोत्साहन आणि विकास हाही एक महत्त्वाचा भाग आहे. 'व्हॉइस ऑफ मीडिया'ने राबवलेला हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता, पत्रकारांच्या कुटुंबांशी संवाद साधणारा एक हृद्य प्रयत्न ठरला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या