शिवशंकर बझारच्या वार्षिक सभेत ग्राहकहित व पारदर्शकतेचा मंत्र
चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : "ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरणाऱ्या सहकारी संस्थांना वस्तू व सेवा कर (GST) मधून सवलत मिळावी," अशी ठाम मागणी शिवशंकर बझार मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केली आहे.
शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था व शिवकिर्ती महिला औद्योगिक सह. संस्था यांची अनुक्रमे 30 वी व 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर बझारच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखापरीक्षक व करसल्लागार सीए नितीन कुदळे यांच्यासह दोन्ही संस्थेचे संचालक व सभासद व मान्यवर उपस्थित होते. बझारचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी दोन्ही संस्थेचे विषय वाचन केले.
पुढे बोलताना डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील म्हणाल्या, राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग महर्षि स्व.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येय धोरणानुसार यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. “संस्था अत्यल्प नफ्यावर ग्राहकांना स्वस्त व दर्जेदार वस्तू पुरवते. राज्यभर नव्हे तर देशभरातील विविध राज्यांतून थेट कंपन्यांकडून माल खरेदी करून अल्प दरात विक्री केली जाते. तरीदेखील संस्थेला दरवर्षी सुमारे २५ लाख रुपयांचा जीएसटी भरणा करावा लागतो. अशा संस्था सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्यामुळे त्यांना जीएसटी मधून सवलत मिळणे अत्यावश्यक आहे.”
सध्या संस्थेच्या मुख्य शाखेसह माळशिरस तालुक्यात आठ शाखा कार्यरत असून, ग्राहकांसाठी मुदत ठेव, सभासद ठेव, बचतीच्या योजना व बक्षीस योजना राबवल्या जातात. यावर्षीही सभासदांना १०% लाभांश देण्यात येणार आहे.
लेखापरीक्षक सीए नितीन कुदळे यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “शिवशंकर बझारने स्वच्छ, दर्जेदार वस्तू देत बाजारात आपली खास ओळख निर्माण केली आहे. महिलांना रोजगार देऊन आर्थिक सक्षमता वाढवणे, संगणकीकरणामुळे व्यवहारात पारदर्शकता ठेवणे ही संस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले.”
0 टिप्पण्या