सरकार व विरोधी पक्षातील आमदारांचाही निषेध- सुशिलकुमार पावरा
शहादा :- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,एकनाथ भील, आकाश माळीच, दिनेश पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
वादग्रस्त व बहुचर्चित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक अखेर विधानसभेत दिनांक १० जुलै २०२५ रोजी मंजूर करण्यात आले आहे.या विधेयकाला विरोधी पक्षातील आमदारांनी फारसा विरोध केला नाही. फक्त मापकचे एकमेव आमदार विनोद निकोले यांनी विरोध केला. हे विधेयक मंजूर करू नये म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून यापूर्वीच आम्ही हरकती नोंदवल्या आहेत. दिनांक ९ जुलै २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथेही निवेदन देऊन हे विधेयक मंजूर करू नका,म्हणून आम्ही मागणी केली.परंतू सरकारने सामाजिक संघटनांच्या मागणीबाबत गांभीर्याने विचार केला नाही.म्हणून आम्ही सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो.त्याचबरोबर या विधेयकाला ज्यांनी विरोध केला नाही त्या विरोधी पक्षातील आमदारांनाही निषेध व्यक्त करतो.
या विधेयकानुसार व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही. शासनाला अमर्यादित अधिकार देणाऱ्या या कायद्यावर हरकती सूचना देण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२५ पर्यंत आम्ही दिल्या आहेत. हे विधेयक लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे . म्हणून दिनांक १० जुलै २०२५ रोजी मंजूर करण्यात आलेले महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या