Ticker

6/recent/ticker-posts

भारताला स्मार्ट मीटर नव्हे, स्मार्ट शाळांची गरज आहे -प्रा. राहुल डोंगरे



भंडारा-आज आपण तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात जगत आहोत. सरकारकडून "डिजिटल इंडिया", "स्मार्ट सिटी", "स्मार्ट मीटर" अशा अनेक योजना मोठ्या गर्जनेने राबवल्या जात आहेत. घराघरांत स्मार्ट मीटर बसवले जात आहेत – जे वीज वापर मोजतात, मोबाईलवर बिल पाठवतात, आणि वेळेवर पैसे न भरल्यास वीज बंद करण्याची व्यवस्था देखील करतात.
हे सगळं ऐकायला खूप आधुनिक आणि प्रगत वाटतं. पण प्रश्न असा आहे की – या "स्मार्ट" गोष्टींनी भारताच्या सामान्य नागरिकांच्या जगण्यामध्ये नेमका किती फरक पडतो आहे?
अन् खरं सांगायचं तर, सामान्य माणसाला वीजेचं मीटर नव्हे, शिक्षणाचं "मीटर" महत्वाचं वाटतं.
*खऱ्या अर्थाने देश बदलतो कसा?*
देश बदलतो तो रस्ते, वीज, इंटरनेट यांच्या बळावर नाही – देश बदलतो तो सुशिक्षित, सुसंस्कारित, आणि सजग नागरिकांच्या बळावर. आणि असे नागरिक घडतात ते शाळेत.
आज लाखो विद्यार्थी अशा शाळांमध्ये शिकत आहेत जिथे मूलभूत सुविधा नाहीत – ना स्वच्छ शौचालय, ना पिण्याचे पाणी, ना संगणक, ना प्रयोगशाळा. अनेक ठिकाणी शिक्षकच अपूर्ण संख्येत आहेत. काही ठिकाणी शिक्षक असूनही ते वेळेवर येत नाहीत, कारण त्यांच्यावर शिक्षणाव्यतिरिक्त इतर अनेक जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत – निवडणूक ड्युटी, गणनेचे काम, सर्वे, योजना भरणे इत्यादी.

*स्मार्ट मीटरने काय होईल?*

स्मार्ट मीटर घरात लावले की सरकारला लगेच माहिती मिळते की कोणत्या घराने किती वीज वापरली, किती बिल थकले आहे. वीज तोडायची की नाही हे ठरवणेही स्वयंचलित होते.
पण काय एखाद्या गावातील शाळेत शिक्षक वेळेवर येत नाहीत, शाळा सुरूच होत नाही, मुलं शिकत नाहीत, तर ते "मीटर" कोण मोजणार?
आज आपल्या समाजाला गरज आहे ती अशा मीटरची – जे शिक्षणाचा दर्जा मोजतील, शिक्षकांचे योगदान तपासतील, आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या विकासावर लक्ष ठेवतील.

*स्मार्ट शाळा म्हणजे काय?*
"स्मार्ट शाळा" म्हणजे फक्त संगणक असलेली इमारत नव्हे. स्मार्ट शाळा म्हणजे:
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी व्यवस्था.
डिजिटल साधनांचा योग्य वापर करणारी शिक्षणपद्धती.
शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सशक्त संवाद.
परिसराशी संबंधित उपयुक्त आणि व्यवहार्य शिक्षण.
संस्कार, शिस्त, सहिष्णुता आणि मूल्याधिष्ठित शिक्षण.
विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, तर्कशक्ती, आणि नेतृत्वगुण निर्माण करणारी शाळा.

*स्मार्ट शिक्षण म्हणजे काय?*
आज आपल्या शिक्षणपद्धतीला बदलाची गरज आहे. पाठांतर, परीक्षा आणि गुणांच्या पलिकडे जाऊन शिक्षणाने कौशल्यं द्यायला हवीत. स्मार्ट शिक्षण म्हणजे:
अनुभवाधारित, प्रयोगशील आणि प्रकल्पाधारित शिक्षण
विद्यार्थ्यांच्या गतीनुसार शिकवण्याची पद्धत.
स्थानिक गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम.
डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयुक्त वापर.
स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन, आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त.

*स्मार्ट शिक्षक का हवेत?*
शिक्षक हाच शिक्षणपद्धतीचा आत्मा आहे. चांगले शिक्षक असतील तर गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी यातील भेद कमी होतो. स्मार्ट शिक्षक म्हणजे:
विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणारा.
नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा.
केवळ पुस्तकापुरते न राहता जीवन शिक्षण देणारा.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना ओळखून त्यांचा विकास करणारा.
समाजमन जागृत करणारा आणि प्रेरणा देणारा शिक्षक आहे.

*समाजजागृतीसाठी हाक*
आज सर्वसामान्य नागरिक, पालक, आणि युवकांनी एकत्र येऊन शासनाकडे प्रश्न विचारायला हवेत 
आमच्या गावात वीज मीटर लावायला आलात, पण शिक्षक का आले नाहीत?

*आम्हाला स्मार्ट मीटर दिला, पण स्मार्ट लायब्ररी का नाही?*
आमचं बिल वेळेवर न भरल्यास वीज बंद करता, मग सरकारी शाळा वेळेवर न चालवल्यास जबाबदारी कोणाची?
देशाच्या भविष्याची दिशा ठरते ती वर्गखोल्यांमध्ये. म्हणूनच भारताला स्मार्ट मीटर नव्हे, तर स्मार्ट शाळा, स्मार्ट शिक्षण आणि स्मार्ट शिक्षकांची नितांत गरज आहे.

*अपेक्षा:-*

स्मार्ट मीटर राष्ट्र घडवत नाहीत, पण स्मार्ट शिक्षक राष्ट्र घडवतात!"

देशाच्या विकासाचा खरा पाया म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण.

चला, आपण सगळे मिळून शिक्षणाचे "मीटर" तपासू, आणि शिक्षणव्यवस्थेला खऱ्या अर्थाने "स्मार्ट" बनवूया!

... राहुल डोंगरे...
 "पारस निवास "शिवाजी नगर तुमसर .जि .भंडारा . म. रा.
मो. न.9423413826

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या