चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : “शेतकरी व व्यापारी यांची योग्य ती सोय करून ग्राहकांनाही सुविधा देऊन अकलूजचा आठवडे बाजार दर्जेदार करणार आहोत,” असे आश्वासन अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिले.
नवीन बाजारतळावर आयोजित बाजार व्यवस्थापन संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. या वेळी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, बांधकाम विभाग प्रमुख धोंडीराम भगनुरे, विद्युत विभागाचे पवन भानवसे, आरोग्य विभागाचे मेहबूब शेख, तसेच नितीन काकडे, सुनील काशिद यांच्यासह सर्व विभागांचे कर्मचारी, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले की, “शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या असून सर्वांना एका छताखाली बसवले तर व्यवसायाला चालना मिळेल. शेतकरी व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सध्या ३ कोटी ३३ लाख खर्च करून शेड उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. यातून ३०० जणांची सोय होईल. उर्वरित २०० ते २५० जणांसाठीही आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.”
सध्या अकलूजच्या आठवडे बाजारात सुमारे ५०० व्यापारी व शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात. “सर्वांना सरकारी जागेत योग्य सुविधा देऊन आधुनिक बाजारपेठ उभी करणे हे आपले उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजार व्यवस्थापनात सहकार्य करत मुख्य रस्त्याच्या कडेला बसू नये, असे आवाहन करण्यात आले. ग्राहकांची व वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठीही त्यांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.
या बैठकीत व्यापारी व शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. नगरपरिषदेकडून ते प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना मोहिते पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


0 टिप्पण्या