• सोनमाळा येथील घटना
• दिवाल जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-लाखनी तालुक्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी संबंधित विभागाच्या आशीर्वादाने चुलबंद नदी खोऱ्यातील रेती घाटातून रेती तस्कराकरवी रात्रीचे सुमारास अवैध रेती उपसा व वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. रात्री रस्त्यांवर वाहतूक नसल्यामुळे रेती तस्कर भरधाव वेगाने वाहन चालवित असल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटनेत वाढ होत असल्याचा प्रत्यय सोनमाळा येथे आला. रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने प्रवासी निवाऱ्यास धडक देऊन दिवाल पडल्याची घटना गुरुवार(ता.१६ ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री दरम्यान घडली. यात जीवितहानी झाली नसली तरी शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने तो ट्रॅक्टर कोणाचा. याचा प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करणे आवश्यक झाले आहे. या आधीही रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने नान्होरी अंगणवाडी केंद्राची सुरक्षाभिंत तोडली केली होती. हे विशेष.
लाखनी तालुक्याचे दक्षिणोत्तर टोकावरून चुलबंद नदी प्रवाहित होत असून मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, पळसगाव, विहीरगाव, नरव्हा, पाथरी, मरेगाव, वाकल इत्यादी रेती घाट असून या रेती घाटातील पांढरी शुभ्र व बारीक रेती असल्यामुळे जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातही बांधकाम व्यवसायिकांत प्रचंड प्रमाणात मागणी असली तरी रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय होऊन संबंधित विभागाचे आशीर्वादाने रेती तस्करी जोमात सुरू आहे. या प्रकाराने नदी खोऱ्यातील रस्त्यांची वाट लागली असून पाणी पुरवठा योजनांच्या जलस्त्रोतांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे रेती तस्करांचे फावते अशा चर्चांना ऊत आला आहे.
मिरेगाव, वटेश्वर, सोनमाळा इत्यादी रेती घाटातून सोनमाळा व मोगरा येथील रेती तस्करांनी रेती उच्छाद मांडला असून ६ ते ७ ट्रॅक्टर चे सहाय्याने रात्रीचे सुमारास अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. ही बाब संबंधित विभागाला माहिती असताना सुद्धा कारवाईचे सौजन्य दाखविले जात नसल्यामुळे या तस्करांची हिंमत वाढून शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अतिरिक्त रेती उपसा व ओव्हरलोड, भरधाव वेगाने वाहतूक सुरू आहे. गुरुवारी रात्रीचे सुमारास भरधाव वेगाने रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर चालवित असताना चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन सोनमाळा येथील बस स्थानकाला धडकल्याने बस स्थानकाची दिवाल जमीनदोस्त झाली. रात्रीची वेळ असल्यामुळे या मार्गावर रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. बस स्थानकाला धडक देणारा तो रेती तस्कर कोण याचा प्रशासनाने शोध घेऊन त्याचेवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. या आधीही रविवार(ता.१२ ऑक्टोबर) रोजी मौजा नान्होरी येथील अंगणवाडी केंद्राच्या सुरक्षाभिंतीला रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने सुरक्षाभिंत जमीनदोस्त झाली होती. मुरमाडी/तूप आणि परिसरात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 टिप्पण्या