Ticker

6/recent/ticker-posts

माहूर शहरातील घरकुल थकीत हप्त्यांबाबत नगराध्यक्ष व नगरसेवकांची मंत्रालयात दस्तक !

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत १४० नवीन घरकुलांना मंजुरी !

पहिल्या टप्प्यातील निधीही मंजूर!

माहूर :माहूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत हप्त्यांमुळे वातावरण चांगलेच तापले असून, या मुद्द्यावरून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकशाही मार्गाने निवेदने, उपोषणे व आंदोलने करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर आज दिनांक २१ जानेवारी रोजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष नाना लाड, सभापती विजय कामटकर, नगरसेवक प्रतिनिधी रफिक सौदागर, सय्यद इरफान, अफसर अली, सुमित खडसे, निसार कुरेशी, अमित येवतीकर यांनी मंत्रालय, मुंबई येथे म्हाडाचे अवर सचिव रवींद्र खेतले यांची भेट घेऊन माहूर शहरातील थकीत घरकुल हप्त्यांबाबत सविस्तर चर्चा केली. येत्या १५ दिवसांत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) १.० अंतर्गत ४८२ लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

यासंदर्भात प्रधानमंत्री आवास योजना १.० (वांद्रे पश्चिम) व २.० मंत्रालय कार्यालयात नगराध्यक्ष व नगरसेवकांनी निवेदन सादर केले.
दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत माहूर शहरातील १४० नवीन घरकुलांना दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाचा समहिश्श्याचा निधी मंजूर झाला असून, लवकरच हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
तसेच घरकुलासाठी स्वतःची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना एआरएच व एएचपी योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून घरकुल खरेदीसाठी अर्थसहाय्य देता येईल, असा प्रस्ताव माहूर नगरपंचायतीने सादर करावा, असेही अवर सचिवांनी सूचित केले. यामुळे शहरातील गरीब, भूमिहीन व घर नसलेल्या कुटुंबांना थेट लाभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या पूर्वी ९३२ व आता १४० नवीन लाभार्थी#

माहूर शहरात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ९३२ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे. यापैकी ४५० लाभार्थ्यांचा प्रत्येकी २० हजार रुपयांचा शेवटचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. तर ४८२ लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम प्रगतीपथावर असून भौतिक प्रगतीनुसार निधी वितरित करण्यात आला आहे.
याच योजनेअंतर्गत १८ नोव्हेंबर रोजी ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आतापर्यंत एकूण १५ कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित झाला असून उर्वरित निधीसाठी मात्र लाभार्थ्यांची सहनशक्ती संपत चालली आहे. नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रश्नाला आता स्पष्टपणे राजकीय वळण मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या