Ticker

6/recent/ticker-posts

एसटी बस बिघाड किंवा अपघात झाल्यास त्याच तिकिटावर सर्व प्रकारच्या बसने मोफत प्रवास; प्रवाशांना दिलासा


 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई:-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवासादरम्यान बिघाड झाल्यास किंवा अपघात घडल्यास प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना त्याच तिकिटावर कोणत्याही अन्य एसटी बसमधून विनाशुल्क व तातडीने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार प्रवासी साधी, निमआराम, वातानुकूलित, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी अशा कोणत्याही एसटी बसमध्ये अतिरिक्त पैसे न भरता प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांकडून तिकीटाच्या फरकाची रक्कम मागितल्यास, अडवणूक केल्यास किंवा बसमध्ये प्रवेश नाकारल्यास संबंधित कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात बस बिघाड किंवा अपघात झाल्यास प्रवाशांना आता दुसऱ्या बससाठी वेगळे तिकीट काढण्याची गरज राहणार नाही.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि अडचणी आल्यास तात्काळ एसटी प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या