चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी स्मृतीनिमित्त “हिंद-की-चादर” हा भव्य शासकीय व सामाजिक कार्यक्रम दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. धर्म, मानवता, सहिष्णुता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम नांदेडच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक, समाजबांधव व विविध पंथांचे प्रतिनिधी नांदेडमध्ये दाखल होणार असून, जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यासंदर्भात नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी, युवक-युवतींनी, महिला, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक “हिंद-की-चादर” कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
हा कार्यक्रम केवळ एका समाजाचा नसून, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा असल्याने, सर्वांनी सहभागी होऊन नांदेडची सकारात्मक ओळख देशपातळीवर उंचावावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


0 टिप्पण्या