Ticker

6/recent/ticker-posts

वरद विनायक पर्यटन स्थळ होत आहे अपघात प्रवण स्थळ.

प्रदूषणाने फेयरी लँड स्कूल विद्यार्थी, परिसरातील नागरिक, व पर्यटक हैराण.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहराच्या प्राचिन इतिहासाच्या वैभवाचा साक्षीदार व  विदर्भात सर्वदूर ख्याती प्राप्त, नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असणारे हे देवालय गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. उंच टेकडीवर वरद विनायक मंदिर पायथ्याशी प्राचिन काळातील तलाव , सभोवताल निसर्ग रम्य झाडे झुडपे, खाली सूर्यमुखी हनुमान मंदिर, पर्यटक निवास यामुळे पर्यटक, भाविक भक्तांची रीघ लागलेली असते.रेल्वे विस्तारीकरण कामामुळे याच मुख्य रस्त्यावरून दिवस रात्र अवजड क्षमतेची वाहतूकहोत असल्याने कधी नव्हे ते अलीकडे प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढीस लागलेआहे. हायवा, ट्रक वाहतुकीने धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने मंदिरालगत असणाऱ्या फेयरी लॅन्ड स्कूल मधील विद्यार्थ्यांचा व फ्लोरा सिटी या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचा तद्वतच येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. इथला निसर्गरम्य परिसर अक्षरशः प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत असताना सुद्धा स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग,या अवजड व जीवघेण्या वाहतुकीवर अंकुश ठेवण्यात पावले उचलण्यात कसूर करीत आहेत. एवढेच नव्हे तर भर शहरातून हि अवजड अधिक क्षमतेची वाहतूक होत असताना सुद्धा यावर नियमानुसार प्रतिबंध घालण्यात येत नसल्याने बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते रेल्वे गेट क्रमांक,३५ पर्यंतचा मुख्य मार्गाची अवस्था जर्जर होऊन अपघाताला आमंत्रण देणारी विदारक परिस्थिती निर्माण होत आहे.
प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेवकांनी व नगर परिषद अध्यक्ष प्रफुल चटकी यांनी वेळीच दखल घेऊन या बेलगाम व अवजड वाहतुकीवर निर्बंध आणून या निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कार्यवाही करावी. अशी मागणी परिसरातील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे तसेच विद्यार्थी , व भक्तांकडून करण्यात येत आहे.
वेळीच लगाम न लावल्यास या क्षेत्रातून होणारी वाहतूक जनआंदोलनातून थांबविण्यात येईल अशी मार्मिक भावना प्रभाग क्रमांक १४ च्या नागरिकांनी बोलून दाखविली.

--------------------------------------
माझ्या प्रभागातील या समस्येची मला जाण असून  प्रभागाचा जबाबदार नगरसेवक म्हणून मी स्वतः याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करून यावर तोडगा काढण्यासाठी निश्चतच प्रयत्न करील, व या परिसराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी बांधिल राहील.

     राजेश शामराव बदखल तज्ञ स्वीकृत नगरसेवक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या