चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-साकोली तालुक्यातील टिळक विद्यालय, खंडाळा येथे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छता, शिस्त आणि देशभक्तीपर वातावरणाने भारावून गेला होता.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. पी. एन. कापगते सर, डी. डी. तुमसरे सर, ए. आर. कुंभरे सर, आर. एम. भेंडारकर सर, ए. पी. काशिवार सर, एम. यू. मेश्राम मॅडम तसेच शिवप्रतिष्ठान धर्मापुरी चे पदाधिकारी सौरभ खोटेले, निलेश डोये व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा आढावा घेत स्वच्छता, समाजसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षण प्रसार यांसारख्या त्यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. “स्वच्छता हीच खरी सेवा” हा त्यांचा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवप्रतिष्ठान धर्मापुरी तर्फे शिवजयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पेपर पॅड, नोटबुक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळा उत्साहात व टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन ए. आर. कुंभरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पी. एन. कापगते सरांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून केले.
या जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा जागृत झाली असून समाजसेवेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या