Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालय खंडाळा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-टिळक विद्यालय खंडाळा तालुका साकोली  येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणायुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षक पी. एन. कापगते, डी. डी. तुमसरे, ए. आर. कुंभरे, एम. यु. मेश्राम मॅडम व सुनील मेंढे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
         याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित ओघवती भाषणे, प्रेरणादायी पोवाडे आणि देशभक्तीपर गीते सादर केली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवकालीन नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. 'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला होता.
          याप्रसंगी  मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि त्यांचे लोककल्याणकारी राज्य यावर प्रकाश टाकला. तसेच डी. डी. तुमसरे सर, पी. एन. कापगते सर आणि ए. आर. कुंभरे सर यांनी महाराजांच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंगांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीचा संदेश दिला. शिवरायांचे विचार केवळ भाषणात न ठेवता ते आचरणात आणणे हीच खरी मानवंदना ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
          कार्यक्रमाचे संचालन कु. राजश्री कांबळे व दिव्या पुस्तोडे या विद्यार्थिनींनी अतिशय प्रभावीपणे केले. 
           शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेवटी 'वंदे मातरम' या गीताने कार्यक्रमाची अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांगता करण्यात आली.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या