Ticker

6/recent/ticker-posts

१९ वर्षांपासून नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकावर 'कलम १२६' चा बडगा



चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखणी : मागील १९ वर्षांपासून नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करणाऱ्या एका अल्पभूधारक चहा विक्रेत्यावर महावितरणने अचानक अनधिकृत वीज वापराचा ठपका ठेवत १५ हजार ८५० रुपयांचे दंडात्मक बिल थोपले आहे. विशेष म्हणजे, पंचनाम्यावर कारवाईची भिस्त आहे, पंचनामा ग्राहकाला न समजणाऱ्या भाषेत करून त्याची दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप ग्राम रेंगेपार/कोठा येथील पीडित ग्राहकाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेंगेपार येथील रहिवासी डीश्वेश्वर दामाजी काटगाये हे मागील १९ वर्षांपासून आपल्या छोट्याशा व्यवसायातून उदरनिर्वाह करतात. आजवर त्यांच्या नावावर कोणताही वीज चोरीचा किंवा थकबाकीचा डाग नाही. मात्र, ४ फेब्रुवारी रोजी लखनी उपविभागाच्या भरारी पथकाने त्यांच्या जागेची तपासणी केली. यावेळी काटगाये यांनी दुसऱ्याला वीज पुरवठा केल्याचा दावा करत त्यांच्यावर विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तपासणी पथकाने केलेला पंचनामा हा स्थानिक मराठी भाषेत नव्हता. "मला त्यातील तांत्रिक शब्द आणि भाषा समजत नव्हती, तरीही अधिकाऱ्यांनी माझ्याकडून सही घेतली," असे पीडित ग्राहकाचे म्हणणे आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ग्राहकाला समजेल अशा भाषेत पंचनामा करणे बंधनकारक असताना, महावितरणने हा नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.

एकीकडे मोठे थकबाकीदार मोकाट असताना, छोट्या चहाच्या टपरीवर उपजीविका करणाऱ्या सामान्य ग्राहकाला १५ हजार रुपयांहून अधिकचा दंड लावल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार केवळ श्रेणी बदलाचा असताना, तो 'अनधिकृत वापर' या गंभीर सदरात का टाकला गेला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


मी १९ वर्षांपासून एकही बिल थकवलेले नाही. जर काही तांत्रिक चूक होती, तर मला समज द्यायला हवी होती. मला न समजणाऱ्या भाषेत कागद तयार करून माझ्यावर हा अन्याय केला आहे. मी याविरोधात वरिष्ठ स्तरावर दाद मागणार आहे.
> — डीश्वेश्वर काटगाये, पीडित ग्राहक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या