“गौरव मराठी भाषेचा, जागर आपल्या मातृभाषेचा”
अकलूज :-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालय अकलूज येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या स्मृतीने आणि ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीत गायनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा व आजच्या काळातील उपयुक्तता यावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व व्याख्याते पंचवटी अकलूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक सुहास उरवणे व राजाराम गुजर उपस्थित होते.यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुजर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर सुंदर कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. “माझा मराठीचा बोलू कौतुके” या विषयावर मार्गदर्शन करताना तर सुहास उरवणे यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे आणि दैनंदिन व्यवहारात तिचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमित घाडगे यांनी मराठीच्या दैनंदिन जीवनातील वापराच्या महत्त्व बाबत मार्गदर्शन केले.यावेळी कु.ऐमन तांबोळी आणि कु.श्रावणी दोरकर या विद्यार्थिनींनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने अत्यंत प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली.विद्यार्थिनींनी मराठी कविता वाचन,भाषणे,कथा सादरीकरण तसेच अभंग- भावगीतांच्या माध्यमातून मराठी भाषेची गोडी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सर्वांनी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाची शपथ घेतली.या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.अमित घाडगे,सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.गौरी कुबेर आणि कु सृष्टी पाटील या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन कु.स्वप्नाली पवार हीने केले.सदरील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तृतीय वर्षाच्या ‘शिवकन्या ग्रुप’ यांनी केले.सदरील कार्यक्रम महाविद्यालय विकास समितीच्या सभापती कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनातून साकार करण्यात आला.


0 टिप्पण्या