माहेश्वरीताई आपले कौतिक करावे तेवढे कमीच...!
प्रासंगिक:- रवि भोंगाने
सृजनशीलता, संस्कार, बुद्धीचातूर्य, प्रसंगवधान आणि सामाजिक भान,भौगोलिक परिस्थितीचे आकलन. अशा परिस्थितीचे भान ठेवून स्वतःची अंगकुशलता पणास लावलेले कौशल्य यामुळे हाताबाहेर जाऊ लागलेली परिस्थिती कशी आटोक्यात येऊ शकते याचे प्रत्यंतर काही दिवसापूर्वी साकोली तालुक्यात दिसून आले. असा गुणात्मक दर्जा ज्यांच्या वाटेला येतो त्यांच्यामुळे कुटुंब, समाज, राजकारण यांच्या सभोवताल संस्कामय एक दुर्मिळ वातावरण तयार होऊ लागते. आणि असे वातावरणच मग कुटुंबाला, गावाला, समाजाला आणि देशालासुद्धा सृजनतेकडे घेऊन जात असते. साकोली तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात माहेश्वरी नेवारे हया कोण आहेत त्यांची तशी नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरीही प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधी म्हणून काही गोष्टी नागरिकांना नव्याने अवगत करून हे कर्तव्य ठरत असते. साकोली तालुक्यातील किन्ही ( एकोडी ) जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्य असलेल्या माहेश्वरीताई नेवारे ह्या प्राध्यापकसुद्धा राहिलेल्या आहेत हे फार कमी लोकांना माहीती आहे. माहेश्वरीताई यांनी अगदी प्रसंगावधान राखून केवळ २ महिलांच्या जीवच वाचविला नाही तर साकोली तालुक्याला आणि साकोली तालुक्याच्या पोलीस विभागाला त्यांनी एका कलंकित घटना होण्यापासून आपले चातुर्य पणास लावले. राजकारणात राहूनही राजकारणाच्या पलीकडे आपण काय करू शकतो हे नेवारे यांच्या माध्यमातून दिसून आले. कधीकाळी प्राध्यापक राहीलेल्या माहेश्वरीताई यांनी आपली कुशलता दाखवून दिली आणि म्हणून सर्व स्तरावर त्यांचे कौतिक करावे तेवढे कमीच आहे. अलीकडे आपल्या समाजात आणि देशात अफवांचा रोग पसरविला जात आहे. काही बिनडोक लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी अफवा पसरवितात आणि आम्हीसुद्धा सारासार बुद्धीच्या निकषावर न तपासता बिनडोकपने अफवांना फॉरवर्ड करीत असतो.त्यामुळे काही त्या अफवांच्या लाटेवर स्वार होऊन उडी मारतात. परंतु तात्पुरत्या असलेल्या लाटेवर स्वार होणारा आपलाही जीव गमावून बसतो किंवा दुसऱ्याचाही जीव घेतो.
अलीकडच्या काळात आपल्या राज्यात अज्ञानापायी आणि अफवेपायी अनेक कलंकित घटना घडलेल्या आहेत. आता तर जणूकाही अफवांना महापूरच आला आहे. मात्र या घटनेत या महिलांचा जीव वाचविण्यात माहेश्वरीताई यांची प्रमुख आणि कणखर भूमिका राहिलेली आहे. शिक्षण क्षेत्रात आणि राजकारणात वावरणाऱ्या माहेश्वरीताई यांनी नागरिकांच्या स्वभावाची नस अचूकपणे पकडली आणि हाच अभ्यास आज कामी आला आहे. माहेश्वरीताई आपले कौतुक कुणी करो न करो पण एक प्रसिद्धी माध्यमांतील गत पंचवीस वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो या दोन्ही महिलांचा जीव जर धोक्यात आला असता तर होणारे परिणाम भयंकर झाले असते ? आम्हाला या घटनेची तीव्रता आणि त्यांचे उमटणारे पडसाद याचा पूर्ण अभ्यास जाणीव आहे. एकोडी सारख्या गावी अशी घटना घडली असती तर पोलीस विभागासाठी निश्चितच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असती. कारण यापूर्वी एकोडी परिसरातील अनेक घटनांचा अनुभव तालुक्यातील नागरिकांना माहित आहे. त्यामुळे म्हणूनच आपणास साक्षात दंडवत ! मानाचा मुजरा !
______________________________________________
घटनाक्रम
______________________________________________
एकोडी परिसरात २ महिला फिरत असतांना त्यांची भाषा स्थानिक नागरिकांना कळत नव्हती. त्यातच सोशल मीडियावर पसरलेली अफवा आणि चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांचा संशय बळावला. बघता बघता तिथे शेकडो लोकांची गर्दी जमा झाली आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला. ही माहिती किन्ही ( एकोडी ) जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्य राहिलेल्या माहेश्वरी नेवारे यांना काळली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी संतप्त जमावाला शांत केले व दोन्ही महिलांना विश्वासात घेऊन सुरक्षित स्थानी आणले. नेवारे यांनी तातडीने एकोडी पोलीस चौकीचे कर्मचारी वैरागडे आणि साकोली पोलीस ठाण्याचे स्वप्नील गोस्वामी यांना बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही महिलांना आपल्या संरक्षणात साकोली ठाण्यात नेले. तिथे केलेल्या सखोल चौकशीत त्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीतील नाहीत ही माहिती समोर आली. त्या मानसिकदृष्ट्या काही अस्वस्थ असून रस्ता भरकटल्याने त्या या परिसरात पोहचल्याचे प्रकरण समोर आले.


0 टिप्पण्या