Ticker

6/recent/ticker-posts

साकोलीत शहरात लांडग्यांचा पगमार्क

प्रभाग ५ मध्ये भीतीचे सावट 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-साकोली नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळच्या वातावरणाला अचानक भीतीची किनार लाभली जेव्हा परिसरात लांडग्यांचे पगमार्क (पावलांचे ठसे) आढळून आले. प्रत्यक्ष लांडगे दिसले नसले तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे हे ठसे नागरिकांच्या मनात खोलवर भीती निर्माण करून गेले आहेत. सकाळी रोजच्या कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक, शाळेकडे निघालेली निष्पाप मुले, तसेच अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांच्या पालकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. आपण खरोखर सुरक्षित आहोत का ? काही दिवसाआधी याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली होती. परिसरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण आता संशयाच्या नजरेने पाहिले जात असून परिसरात एक अनामिक दहशत पसरली आहे. ही गंभीर बाब समजताच प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक तथा गटनेता  संदीप बावनकुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वन विभागाशी संपर्क साधला. वनपाल चरणलाल बालपांडे तसेच वनरक्षक खंडागळे यांना तातडीने घटनास्थळी बोलविण्यात आले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितचा आढावा घेतला असून परिसरात तात्काळ गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन वन्यप्राण्यांचा वावर रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 
दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. शक्यतो एकटे बाहेर पडणे टाळावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या