Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर : क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची १९३ वी जयंती  आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने  वसतिगृहात उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे गृहपाल पी. एस. चव्हाण  होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त गोंड राजे डॉ. वीरशहा कृष्णशहा आत्राम, डॉ. विक्रांतशहा आत्राम  (मुख्याध्यापक सेंट हिल्डाज इंग्लिश मीडियम स्कूल, वरोरा.) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
प्रमुख मार्गदर्शक डॉ. वीरशहा कृष्णशहा आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील पराक्रम, त्याग आणि आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील या महान क्रांतिकारकाच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन शिक्षण, संघटन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. तसेच समाजाच्या प्रगतीसाठी युवकांनी जागरूक राहून सकारात्मक कार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात पी. एस. चव्हाण  यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिवीर शेडमाके यांच्या आदर्शांचा आदर ठेवत शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले.

रोशन मानकर यांनी परिपत्रकाचे वाचन केले. तसेच कुणाल दडमल व आशिष दडमल यांनी आपले मनोगत व्यक्त करून क्रांतिवीर शेडमाके यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मयूर हनवते यांनी  तर आभार कृतिका रंदई हिने  मानले. कार्यक्रमाला वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता हीच आमुची प्रार्थना या गीताने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या