जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे उपोषणार्थी प्रफुल जाधव यांना लेखी आश्वासन
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर- तालुक्यातील मौजे ईवळेश्वर येथे क्रीडांगण समपातळीत करणे कामासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या मार्फत ७ लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता. सदर निधी कामाकरिता शालेय व्यवस्थापन समिती ईवळेश्वर च्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. परंतु शालेय व्यवस्थापन समितीने कुठलेही काम न करता बनावट कागदपत्रे सादर करून संपूर्ण निधी उचल करून अफरातफर केल्याने सदरील क्रीडांगण समपातळी कामाची चौकशी करून अफरातफर करणाऱ्या संबधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणी करिता शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रफुल जाधव व त्यांचे सहकारी ग्रा.प. सदस्य शिवाजी राखोंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पतंगे, युवा कार्यकर्ते हिरासिंग राठोड, रमेश राठोड यांनी दि. ९ मार्च २०२६ पासून माहूर येथील तहसील कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते.
माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांना कळविताच दि. १० मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी उपोषणार्थीची उपोषण स्थळी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व सदर प्रकरणी चौकशी करून आठवडाभरात दि. १८ मार्च पर्यत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आल्याने जेष्ठ पत्रकार प्रा. प्रवीण बिरादार व शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक सरपंच प्रतिनिधी दुधराम राठोड व पोलीस पाटील अतिश राठोड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेतले.
यावेळी आठवडाभरात कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांनी यावेळी दिला. यामुळे ईवळेश्वर क्रीडांगण समपातळी कामातील अनियमितता व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून यामध्ये हात ओले असणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांचे धाबे दणाणले आहे. याबाबत काय कारवाई होते याकडे ईवळेश्वर येथील विकासप्रेमी सुज्ञ जनतेचे लक्ष लागले आहे. !


0 टिप्पण्या