चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे:-ग्रामीण जीवन, शेतकरी प्रश्न आणि निसर्गभावना आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडणारे रान कवी हनुमंत चांदगुडे यांनी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी “काव्यमय संवाद कौशल्य” या विषयावर मार्गदर्शन केले.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी रानकवी हनुमंत चांदगुडे यांचे स्वागत केले.यावेळी प्राचार्य अशोक काळंगे, मुख्याध्यापक प्रमोद भोंग,मुख्याध्यापक महादेव बागल,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,प्राध्यापक डॉ.विजय केसकर,प्रा.विनायक शिंदे इ मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत काव्य आणि संवाद यांचे नाते समजून घेतले.मराठी विभाग आयोजित मृदू कौशल्य श्रेयांक अभ्यासक्रम अंतर्गत व्यक्तीमत्व विकास कौशल्य कार्यक्रम प्रसंगी काव्यमय संवाद कौशल्ये विषयी चांदगुडे बोलत होते.
या वेळी बोलताना कवी चांदगुडे यांनी शेतकरी आत्महत्येचा संवेदनशील विषय कवितेतून कसा मांडता येतो यावर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या वेदना, कर्जबाजारीपणा, निसर्गातील अनिश्चितता आणि समाजाची जबाबदारी यांचा प्रभावी उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव जागृत ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच “बांधावरील कविता” या संकल्पनेतून त्यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणा, मातीशी असलेले नाते आणि निसर्ग निरीक्षणातून कविता कशी जन्माला येते याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. प्रत्यक्ष अनुभव, मनातील भावना आणि शब्दांची सहज अभिव्यक्ती यांमधून कविता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
“कविता ही केवळ साहित्य नसून प्रभावी संवादाचे माध्यम आहे. योग्य शब्द, भावनिक अभिव्यक्ती आणि सामाजिक भान यांमुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होते,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय केसकर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा बनसोडे व आभार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या