राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा २०२६
अकलूज लावणी स्पर्धेचे दिमाखदार उदघाट्न
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जतन करण्याचे कार्य केलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अकलूज नगरीमध्ये त्यांच्या १०८ व्या जयंती निमित्त सालाबादप्रमाणे सहकार महर्षी जयंती समारंभ समितीच्या वतीने कलावंतांच्या पंखात बळ देऊन लोककलेला गतवैभव प्राप्त करून देणाऱ्या आदरणीय जयसिंह मोहिते-पाटील उर्फ बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य स्पर्धेचे उदघाट्न मा. सौ. सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते-पाटील, जयंती समितीचे संस्थापक मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील, मा. सौ. सुमित्रादेवी खानविलकर, अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक मा. चि. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लावणी स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सहकार महर्षींच्या सांस्कृतिक कलेची जोपासना करण्याच्या उद्देशाने १९९३ सालापासून जयंती समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेतील पारंपरिक लावणीने जन-माणसात लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्येने रसिक प्रेक्षक या कलेचा निखळ आनंद घेतात. आजकालच्या डॉल्बीच्या युगात पारंपरिक लावणी जिवंत ठेवणे हे एक मोठे आव्हान असून समितीच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून अविरतपणे जयंती समितीचे संस्थापक मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील (बाळदादा) यांच्या मार्गदर्शनाखाली कलेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लावणी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. शेवटी सर्व कलाकारांचे, पार्टी प्रमुख, थिएटर मालक उपस्थित रसिकांचे स्वागत केले.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा, पार्टी प्रमुखांचा यथोचित सत्कार जयंती समितीच्या वतीने करण्यात आला.
यानंतर स्पर्धेतील लावण्यांच्या सादरीकरणास सुरुवात झाली.
आज अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा, गीता अश्विनी, श्रुती वाईकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गोकुळ शिरगांव, अपर्णा, कीर्ती नगरकर, लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी वैशाली समसापूरकर, जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी व बेला, श्रद्धा नेतटूरकर सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी फाटा (पांढरीचा पूल) या पार्ट्यांचे सादरीकरण झाले. यावेळी लावणी कलाकारांनी वेगवेगळ्या अदा, कला व नजाकतेचे प्रदर्शन करून रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यांनी लावणी कलाकारांना दाद देताना स्वतःही त्यांच्या सोबत ठेका धरत त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमास सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कर्ते रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर, पांडुरंग घोटकर, थिएटर मालक सुरेखा पवार, कल्याणी घावरे, अनिता डवरी, डॉ. अशोकराव जाधव, किसनराव जाधव, सुरेश हरगुडे, भरत पालवे, संदीप चंदन, रूपा परभणीकर यांचे सह कलाकार,रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील, किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समारंभ समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या