भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला प्राचीन काळापासून अत्यंत मानाचे स्थान दिले गेले आहे. “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता” या उक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो, त्या ठिकाणी देवताही वास करतात असे मानले जाते. स्त्री ही आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध रूपांत समाजाला प्रेम, संस्कार आणि मायेची देणगी देत असते. त्यामुळे समाजाच्या उभारणीत स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
मात्र काही काळ असा होता की सामाजिक परंपरा आणि रूढी यांमुळे महिलांचे जीवन अनेक मर्यादांमध्ये अडकून पडले होते. त्यांना शिक्षण घेण्याची, घराबाहेर पडण्याची किंवा स्वतःच्या निर्णयाचा अधिकार मिळण्याची संधी फारच कमी होती. परंतु कालांतराने समाजामध्ये जागृती झाली आणि महिलांच्या शिक्षणाला तसेच त्यांच्या हक्कांना महत्त्व मिळू लागले. या परिवर्तनामुळे आज महिलांचे स्थान समाजात अधिक बळकट झाले आहे.
महिलांच्या प्रगतीमध्ये शिक्षणाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, त्यांना स्वतःची क्षमता ओळखता आली आणि त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले. आज महिला वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, संरक्षण सेवा आणि उद्योग या अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
भारतीय समाजात अनेक महान महिलांनी आपल्या कार्याने इतिहास घडवला आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अन्याय याविरुद्ध लढा देत स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला.
तसेच कल्पना चावला यांनी अंतराळ क्षेत्रात कार्य करून संपूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल केले. त्यांचे धैर्य आणि जिद्द आजही अनेक तरुणांना प्रेरणा देतात. क्रीडा क्षेत्रामध्ये मेरी कोम यांनी आपल्या परिश्रमाने आणि चिकाटीने जागतिक स्तरावर भारताचा मान उंचावला. या सर्व महिलांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले की महिलांमध्ये अपार शक्ती आणि क्षमता आहे.
आजच्या काळात महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच समाजाच्या प्रगतीतही मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे.
तथापि, अजूनही काही ठिकाणी महिलांना अन्याय, भेदभाव आणि असमानतेला सामोरे जावे लागते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना समान संधी देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महिलांचे शिक्षण, स्वाभिमान आणि सुरक्षितता यांना प्राधान्य दिल्यास समाज अधिक प्रगत आणि समृद्ध होऊ शकतो.
महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा आणि संघर्षाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती आहे. म्हणूनच प्रत्येकाने महिलांचा सन्मान करणे, त्यांना योग्य संधी देणे आणि त्यांच्या प्रगतीला पाठिंबा देणे आवश्यक आहे. स्त्री सशक्त झाली तर समाज आणि राष्ट्र निश्चितच प्रगतीच्या दिशेने पुढे जाईल.
लेखन :- रुपेश पांडुरंग कुत्तरमारे (उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त) वरोरा ,चंद्रपूर


0 टिप्पण्या