चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर:-अतिक्रमणाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून होळीच्या दिवशी दैनिक नवराष्ट्र निर्माणच्या एका प्रतिनिधीच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली.
शहरातील स्थानिक दैनिक नवराष्ट्र निर्माणचे जिल्हा विशेष प्रतिनिधी योगेश मुऱ्हेकर यांच्यावर चार ते पाच जणांनी अचानक हल्ला केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि योगेश मुऱ्हेकर हे आपल्या निवासस्थानी कुटुंबीयांसोबत असताना अचानक हल्लेखोरांनी थेट घरात प्रवेश केला व त्यांच्यावर धावून जाऊन जात मारहाण केली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुऱ्हेकर काही क्षण स्तब्ध झाले; मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या परिवाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.
सदरहु प्रकरणामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.
“आता प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार सुद्धा सुरक्षित नाहीत का?” असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होतोय आहे.
अतिक्रमण तक्रारीचा राग?
----------------------------------
चार महिन्यांपूर्वी मुऱ्हेकर यांनी म्हाडाच्या जागेवर एका मटण दुकानदाराकडून करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून संबंधित मटण शॉपच्या मालकाने मुद्दाम भांडण उकरून काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुकानातील किरकोळ वाद वाढवत तो थेट घरापर्यंत नेण्यात आला आणि बाहेरून काही तरुणांना बोलावून हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसात तक्रार दाखल!
----------------------------------
या घटनेची पत्रकार योगेश मुऱ्हेकर वय ४७ रा.म्हाडा कॉलनी दाताळा जिल्हा.चंद्रपूर यांनी लगेच येथील रामनगर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली फिर्यादी च्या बयाना वरून दाताळा येथील नामे साहिल जीवन निमगडे, जीवन निमगडे, व इतर दोन यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ अन्वये कलम २९६,११५ (२) ३५१ (२),३ (५) नुसार गुन्हा दाखल केल्या गेला आहे.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना जेरबंद करू असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
पत्रकार संघटनांतर्फे निषेध!
----------------------------------
पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी होत असून, दोषींवर तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
ही घटना केवळ एका पत्रकारावरचा हल्ला नसून, सत्य मांडणाऱ्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने आणि निष्पक्ष कारवाई करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


0 टिप्पण्या