ग्रामीण खेळ हरविले : चाकोल्या आणि पळस फुलाचा रंगही बेदखल
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होळीचा आणि धुळवडीच्या सणात खेडला जाणारा हा एक पारंपारिक खेळ आहे. ग्रामीण भागात घानमाकडचा (कुरकुंजा) खेळ सुरू होतो. पळसाच्या लाकडापासून बनवलेल्या धनूष्याकृती रचनेवर संतुलन साधुन गोलगोल फिरविला जातो! हा खेळ लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. आता शहरीकरणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या पंचेवीस - तिस वर्षापूर्वी खेड्या - पाड्यातील मोकळ्या मैदानावर दिसायची. गोलाकार फिरणाऱ्या आणि कर-कर असा आवाज येणाऱ्या या घानमाकडीबद्दल बालकात विशेष आकर्षण असायचे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बालपणीचे खेळ हरविले आणि घानमाकडही आता नामशेष झाली आहे. माघ महिना संपताच फाल्गून महिन्याची सुरुवात होऊन होळीची चाहूल लागते. होळीच्या एक महिना अगोदरपासूनच तयारी सुरू होत असे शेणापासून चाकोल्या तयार केल्या जायच्या . तसेच गावातील उत्साही मुले घानमाकड तयार करायचे. गावालगतच्या जंगलात जाऊन पळसाचे वक्राकार लाकूड आणले जात होते. लाकडाचा ओंडका जमिनीत गाढून त्याला टोक काढायचे. त्या टोकावर धनुष्याकृती लाकडाला मधोमध कोरुन ठेवले जात आणि दोन्ही बाजूला मुलांना बसवून गोलगोल फिरविले जात. घानमाकडीच्या खोल खाचेत कोळशाचे तुकडे फसविले जायचे. धनुष्याच्या आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोलगोल फिरविले जायचे. या घानमाकडीच्या खेळात लहान मुले दंग व्हायचे. आज दुर्गम खेड्यामध्ये घानमाकड दिसत असले तरी शहरीकरणामुळे अनेक खेड्यातून ही घानमाकड आता नामशेष झाली आहे. २५ ते ३० वर्षापूर्वी हमखास दिसणारी घानमाकड आता दिसतच नाही. बालविश्वाचे सण-संस्कृतीशी नाते जोडणारी ही घानमाकड आता चित्रातच पाहावी लागते. यासोबतच होळीच्या सणापूर्वी लहान मुले शेणापासून चाकोल्या तयार करीत होते. चाकोल्या वाळू घालून त्याची हार बनवून होळीत टाकल्या जात होती. तसेच पळस फुलांपासून परंपरागत रंगही तयार केला जात होता. परंतु आता हा सर्व प्रकार मागे पडला आहे.
हा खेळ म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आणि होळीच्या परंपरेला एक अविभाज्य भाग होता. तो आता केवळ आठवणीतच राहिला आहे.


0 टिप्पण्या