तब्बल 42 वर्षानंतर एकत्र मिळालेल्या वर्ग मित्रांची एक अनोखी महफिल....
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-शालेय शिक्षणानंतर पदवी पदविका.. त्यानंतर नोकरी, मोठ मोठे पद .. मोठा व्यवसाय..समाजात रुतबा... आणि कालांतराने सेवानिवृत्ती.. असा हा जीवनाचा प्रवास.आयुष्याच्या प्रवासात धावता धावता कधीतरी मागे वळून पहावसं वाटतं. जे मागे सुटून गेले त्यांना पुन्हा भेटावसं वाटतं. आयुष्याच्या विशिष्ट वळणानंतर जीवनात असाही योग येतो, ज्यांच्या खांद्यावर मित्र म्हणून हात ठेवीत खेळत बागडत होतो , तेच मित्र चक्क बेचाळीस वर्षानंतर आज आजी-आजोबा या रूपात आपल्यापुढे येतात तेव्हा काय धमाल उडते हा तो योग होता.सेकंडरी एज्युकेशन सोसायटी साकोली वर्ष1982 ते 84 या काळात वर्ग अकरावी व बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच शाळेला भेट देण्याचे ठरविले आणि 28 फेब्रुवारीला तो योग घडून आला. यावेळी 72 मित्र मैत्रिणीची गाठ भेट झाली.ती केवळ एक भेट नव्हती तर तो जुन्या आठवणींच्या एक जिवंत झरा होता. काय रे, ओळखलस का मला? ज्याच्या त्याच्या तोंडी हाच जीव्हाळ्याचा प्रश्न..
सर्वांनी वर्ग खोलीमध्ये बसून फोटो काढला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. जे मित्र आज हयात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. काही प्रकृती अस्वस्थतेमुळे येऊ शकले नाहीत त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी सद्भावना व्यक्त करण्यात आली.त्यानंतर सर्व मित्रांचा मोर्चा सोनेगाव ला नंदलाल गहाणे या वर्ग मित्राच्या फार्म हाऊस कडे वळला.
प्रामुख्याने डॉक्टर अनिल चांदेवार आणि डॉक्टर उषा डोंगरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्रांची महफिल रंगली. परिचयाचे सत्र सुरू झाले. कुणाला कुणाचे नाव आठवेना.. कुणाला चेहरा आठवेना ..सारं काही बदललेलं.
42 वर्षात चेहरा मोहरा बदललेला, कुणाचे केस पांढरे झालेले तर कुणाचे कमी, बोबडी भाषा, जबड्यातील दातांची संख्या कमी.. खरी कसरत ओळख पटवण्याची होती. आता कुणाचे पद काय किंवा कोणाकडे किती पैसा आहे यापेक्षा आरोग्य आणि समाधान यावरच खरी चर्चा रंगली. आयुष्याच्या धडपडीतून कुठेतरी निवृत्त झाल्यावर मिळणारी एक निवांत शांतता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसली. सासू सासरे, आजी आजोबा झाल्याचा आनंद, नातवंडाच्या खोड्या, मुलांचे नातवंडांचे फोटो दाखवण्याचा अनोखा प्रयोग, मुलांचे शिक्षण,मुले काय करतात, कुणाच्या किती परदेशी वाऱ्या झाल्या यावरच चर्चा.
नैसर्गिक वातावरणात फार्म हाऊस वर स्वादिष्ट भोजन केल्यानंतर आठवणीची एक शिदोरी घेऊन सर्व मित्र आपापल्या घराकडे परतले. तत्पूर्वी हा योग घडवून आणल्याबद्दल सर्वांनी नंदलाल गहाणे, किशोर डोये, प्रशांत गुप्ता, उषा डोंगरवार, झामलाल बोरकर, लुंगाराम करंजकर, दिलीप कातोरे यांचे आभार मानले.


0 टिप्पण्या