आज हा लेख लिहिताना एक गोष्ट मनाला खूप लागते — आपण जयंती मोठी करतोय, पण समाज मोठा करत नाही. आपण DJ मोठा लावतोय, पण विद्यार्थ्यांची स्वप्ने मोठी करत नाही. आपण बॅनर मोठे लावतोय, पण विचार मोठे करत नाही. आणि हे वास्तव आहे, खूप कडू आहे, पण हेच सत्य आहे.
ज्या माणसाने आयुष्यभर भूक, अपमान, अन्याय, भेदभाव सहन करून फक्त एकच गोष्ट सांगितली — शिका,
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आज आपण काय करतो?
लाखो रुपये जमा करतो, DJ लावतो, मिरवणूक काढतो, नाचतो, व्हिडिओ काढतो, स्टेटस ठेवतो… आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं आयुष्य तिथेच सुरू होतं — ना शिक्षण वाढतं, ना नोकऱ्या वाढतात, ना वाचन वाढतं, ना समाज बदलतो.
मग स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा —
आपण बाबासाहेबांना अभिवादन करतोय की फक्त कार्यक्रम करतोय?
खरं सांगायचं तर आज अनेक गावात भिमजयंतीसाठी 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये सहज जमा होतात. पण त्याच गावात एक चांगलं वाचनालय नसतं. मुलांना अभ्यास करायला जागा नसते. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं नसतात. एखाद्या गरीब मुलाला कॉलेजची फी भरायला पैसे नसतात. एखादा हुशार मुलगा फक्त पैशाअभावी शिक्षण सोडतो. एखादी मुलगी फी नसल्यामुळे पुढे शिकत नाही. पण त्याच गावात DJ मात्र 50 हजाराचा असतो. लाईट 30 हजाराची असते. बॅनर 20 हजाराचे असतात.
हे वास्तव आहे, आणि हे वास्तव मनाला टोचलं पाहिजे.
कारण एक गोष्ट लक्षात ठेवा —
DJ वर नाचणारा समाज कधीच इतिहास घडवत नाही;
पुस्तकावर झुकणारा समाज इतिहास घडवतो.
आपण एक दिवस 10 हजार लोकांची मिरवणूक काढतो, पण त्या 10 हजार लोकांमध्ये 100 अधिकारी तयार होत नाहीत. आपण 50 बॅनर लावतो, पण 50 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होत नाहीत. आपण स्टेज लावतो, पण अभ्यासिका लावत नाही. आपण नेत्यांना बोलावतो, पण शिक्षकांना बोलावत नाही. आपण गाणे लावतो, पण व्याख्यान ठेवत नाही. हीच खरी शोकांतिका आहे.
काही लोकांना हे बोललेलं आवडणार नाही, पण सत्य नेहमी गोड नसतं. सत्य नेहमी अस्वस्थ करतं. आणि समाज बदलायचा असेल तर आधी समाजाला अस्वस्थ व्हावं लागतं.
जरा विचार करा —
जर एका गावाने ठरवलं की यावर्षी DJ नाही लावायचा, त्याऐवजी त्या पैशातून वाचनालय सुरू करायचं.
दरवर्षी 10 गरीब विद्यार्थ्यांची फी भरायची.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करायचं.
अभ्यासिका सुरू करायची.
तर 10 वर्षांनी त्या गावातून अधिकारी, शिक्षक, वकील, प्राध्यापक, लेखक, पोलीस, सैनिक तयार होतील की नाही? नक्की होतील.
मग खरी जयंती कोणती — DJ ची की Library ची?
आपण एक गोष्ट विसरत आहोत —
जयंतीचा उद्देश बाबासाहेबांचा फोटो लावणे नाही, तर बाबासाहेबांसारखा माणूस तयार करणे आहे.
समाजाला DJ ची गरज नाही, समाजाला Direction ची गरज आहे.
समाजाला मिरवणुकीची गरज नाही, समाजाला Movement ची गरज आहे.
समाजाला बॅनरची गरज नाही, समाजाला Career ची गरज आहे.
समाजाला आवाजाची गरज नाही, समाजाला अभ्यासाची गरज आहे.
काळजाला लागणारी एक गोष्ट सांगतो —
आपण जयंतीसाठी वर्गणी मागायला प्रत्येक घरात जातो,
पण त्या घरातलं मूल शाळेत जातं का, कॉलेजला जातं का, फी भरली का, पुस्तकं आहेत का — हे विचारायला जात नाही.
हीच आपली सर्वात मोठी चूक आहे.
लक्षात ठेवा,
जयंती मोठी करून समाज मोठा होत नाही;
समाज मोठा केला तर जयंती आपोआप मोठी होते. कवी/गायक:- उमेश जी. बोरकर. साकोली जिल्हा भंडारा.


0 टिप्पण्या