चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत 14 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींसाठी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध (HPV) लसीकरणाबाबत पालकांची मार्गदर्शन सभा उत्साहात पार पडली.विद्यार्थिनींच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सभेत उपजिल्हा रुग्णालय मोशी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांच्या नेतृत्वाखाली डॉ संगीता जैन यांनी पालकांना एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व,गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून होणारे संरक्षण,लसीकरणाची योग्य वेळ तसेच त्याबाबत असलेले गैरसमज याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेवर लसीकरण करणे किती आवश्यक आहे हे ही स्पष्ट केले.यावेळी उपस्थित पालकांच्या विविध शंकांचे समाधान करून लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.दिलीप टिंगणे, डॉ.मेघा झामडे,रितेश कुकडे,विनय शेलुरे,प्रकाश मंगळे व प्रशांत बेहरे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख होते तर पालक प्रतिनिधी म्हणून सौ.धांडे यांची उपस्थिती होती.
या सभेला १४ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एचपीव्ही लसीकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.या उपक्रमामध्ये पालकांमध्ये लसीकरणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थिनींच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्वाचे पाऊल उचलले गेले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष केचे प्रास्ताविक अधिपरिचारिका जयश्री मोरे तर आभार विठ्ठल नवरे यांनी मानले.


0 टिप्पण्या