Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांतील रिक्त प्राध्यापक पदे तातडीने भरण्याची रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषदेत मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उच्च शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली.
राज्यात सुमारे १३,००० सहाय्यक प्राध्यापक पदे रिक्त असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना तासिका तत्त्वावर किंवा कंत्राटी प्राध्यापकांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अध्यापनाची सातत्यता, संशोधनाची गुणवत्ता तसेच संस्थांच्या मानांकन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर बिघडत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता टिकवण्यासाठी उर्वरित रिक्त प्राध्यापक पदे निश्चित कालमर्यादेत भरण्याचा ठोस कार्यक्रम जाहीर करावा, तसेच दीर्घकाळ सेवा देणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या अनुभवाला न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रश्नाला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ११,९१८ रिक्त पदांपैकी ५,०१२ पदांच्या भरतीस शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच सार्वजनिक विद्यापीठांमधील पदभरतीसाठी शासनाने सुधारित निकष निश्चित केले असून शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी ६० टक्के, अध्यापन कौशल्य मूल्यमापनासाठी २० टक्के आणि मुलाखतीतील कामगिरीसाठी २० टक्के गुण या पद्धतीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच या शैक्षणिक वर्षापासून रिक्त पदांचा प्रश्न राहणार नाही, असे सांगत तासिका तत्त्वावरील शिक्षकांना जाहिरातीनुसार संधी मिळेल,असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या