एकार्जुना प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत आज आढावा बैठक
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर - आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून एकार्जुना (ता. वरोरा) येथे २५.८९ कोटी रुपयांचे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र मंजूर करून घेतले. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी आज, मंगळवार, दि. २४ मार्च रोजी मुंबई येथे राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार असून या प्रकल्पाच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळणार आहे.*
आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या एकार्जुना भाजीपाला संशोधन केंद्राला राज्य शासनाने यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आले.संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे, प्रलंबित बाबी निकाली काढणे आणि कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेणे यावर या बैठकीत विशेष भर दिला जाणार आहे.
एकार्जुना येथील या संशोधन केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील भाजीपाला पिकांची उत्पादकता वाढवणे, गुणवत्तापूर्ण बीजोत्पादनाला चालना देणे, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणे तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी अधिक सक्षम व प्रगत व्हावा, या उद्देशाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. आता या बैठकीच्या माध्यमातून प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी आ. मुनगंटीवार प्रयत्नशील आहेत.


0 टिप्पण्या