Ticker

6/recent/ticker-posts

विमा पॉलिसीकरिता शिक्षकांना वेठीस धरणारा तो अधिकारी कोण ?

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-साकोली तालुक्यात महिला तक्रार कर्त्याची क्लिप व्हायरल करण्याचे प्रकरण ताजे असतांना शिक्षण विभागाचे आणखी एक  प्रकरण समोर आलेले आहे. विमा पॉलिसीकरिता नव्या शिक्षकांना वेठीस धरून अधिकार पदाचा गैरवापर करीत  असल्याचे प्रकरण आता प्रसिद्धी माध्यमासमोर आले आहे. परिणामी साकोली पंचायत समितीचा शिक्षण विभाग आता अडचणीत आलेला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तालुक्यात शालांत परीक्षा पार पडल्यात. या परीक्षेत कॉपीयुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. एका महिला तक्रारकर्त्याची मास कॉपी प्रकरणाची क्लिप शिक्षण विभागाने व्हायरल केल्याने शिक्षण विभागाचे या आधीच पितळ उघडे पडले. या तक्रारीवर कारवाई करण्यापेक्षा शिक्षण विभागाने क्लिप व्हायरल केल्याचा नेमका काय उद्देश होता हे आता लपून राहिलेले नाही. इतकेच नव्हे तर आता  दुसऱ्या प्रकरणाचे पुरावे प्रसिद्धी माध्यमांसमोर गवसले आहे. नवीन आलेल्या शिक्षकांना पत्नीच्या नावावर असलेल्या विमा पॉलिसीसाठी साकोली पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचे प्रकरण आता समोर आलेले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आपल्या अधिकार पदाचा वापर विमा पॉलिसी व्यवसायकरीता करीत असल्याचे प्रकरण आता समोर आलेले आहे. विशेष म्हणजे सदर अधिकारी जिथे जिथे कार्यरत होता त्या त्या तालुक्यातून वादग्रस्त झाल्याने हाकलण्यात आले हे विशेष. त्यानंतरही  साकोली तालुक्यात आल्यानंतर या अधिकाऱ्याने आपले कारणामे थांबवले नाहीत. क्लिप व्हायरल प्रकरणात आणि विमा पॉलिसी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागून आहे.
वादग्रस्त ठरलेल्या या अधिकाऱ्याला हाकलणार की निलंबित करणार याकडे तालुक्यातील पालकांचे, शिक्षकांचे लक्ष लागलेले आहेत. तीन तालुक्याची मालगुजारी सांभाळून आलेले हे अधिकारी तिन्ही तालुक्यात वादग्रस्त ठरले. त्यानंतर हे साकोलीत अवतरले. तात्पुरत्या कालावधी करिता प्रतिनियुक्तीवर आलेले हे अधिकारी वेगवेगळ्या कारणांमुळे साकोलीतही वादग्रस्त झाले आहेत. मास कॉपी प्रकरणात क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी आणि विमा पॉलिसीसाठी शिक्षकांना वेठीस धरल्याने तालुक्यात सध्या तरी शिक्षण विभाग बदनामीस पात्र ठरलेला आहे. स्वतःच्या विविध कारनाम्यांमुळे शिक्षण विभागाची वाट लावणाऱ्या या अधिकाऱ्याला खरंच शिक्षण विभाग वाचवेल का ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या