चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : अकलूज नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष रेश्मा अडगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील व मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सभेत विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अकलूज नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व १३ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण २६ हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरातील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
तसेच सर्वसाधारण रस्ता अनुदानांतर्गत नगर परिषद हद्दीतील विविध ठिकाणी रस्ते विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगर परिषद सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे व अत्याधुनिक साऊंड सिस्टिम बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आवश्यक जॅकवेल या उपंगासाठी ७७ मैल येथे नंदविजय अॅग्रो फार्मसी अँड डेव्हलपर्स प्रा. लि. तर्फे नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांनी संस्थेकडून दहा गुंठे जागा विना मोबदला नगर परिषदेला बक्षीस पत्राद्वारे दिल्याबद्दल सभेत त्यांच्या आभाराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने विविध चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल प्रणाली बसविण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दरम्यान, शहीद वीर जवान हनुमंत निवृत्ती करडे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीनारायण नगर अंतर्गत रस्त्यास त्यांचे नाव देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या नावाने महावीर पथ ते उदयसिंह मोहिते पाटील कॉम्प्लेक्स आणि तेथून अकलाई आयसीयू नवीन बसस्थानकाच्या मागील रस्त्याला नामकरण करण्यासही मान्यता देण्यात आली.
सभेत घेतलेल्या या निर्णयांमुळे अकलूज शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


0 टिप्पण्या