कॅप्शन- पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना निवेदन देताना भदंत ससाई
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना दिले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूर शहरात 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी बौद्ध बांधवांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय संघटनांची उपस्थिती असते. जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 एप्रिलला सायंकाळी शहरातील विविध भागांतून निघणाऱ्या मिरवणुका, रॅली वाजतगाजत मध्यरात्रीच्या सुमारास संविधान चौकात पोहोचतात. या रॅलींमध्ये हजारोंचा जनसमुदाय असतो. बाराच्या ठोक्याला केक कापून आनंद साजरा केला जातो. अनुयायांची पहाटेपर्यंत गर्दी असते.
अलिकडे अनुयायांची गर्दी वाढतच चालली आहे. अनुयायांच्या गर्दीत अनुचित प्रकार होण्याची शक्यता असते. संभाव्य धोका आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी 13 एप्रिलच्या रात्री संविधान चौकात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन ससाई यांनी दिले.


0 टिप्पण्या