Ticker

6/recent/ticker-posts

शेगाव–चिमूर महामार्गावर दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉली समोरा समोर धड़क

 ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत भद्रावतीचा तरुण जागीच ठार.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा : शेगाव–चिमूर महामार्गावर  मंगळवारी सकाळी  पद्मावार राईस मिलजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी  सकाळी १० वाजेच्या सुमारास एमएच ३४ बीएस १८८७ क्रमांकाची दुचाकी वरोऱ्याकडून शेगावकडे जात होती. याच दरम्यान, पद्मावार राईस मिलजवळ विना नंबर असलेला महिंद्रा कंपनीचा अर्जुन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वळण घेत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ट्रॅक्टरच्या समोरच्या चाकाखाली जाऊन आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी ट्रॅक्टरच्या चाकामध्ये पूर्णपणे फसली होती. अपघातात स्वामी मलय्या यमलू (वय ३४) आणि संतोष राजू पवार (वय १८, दोन्ही रा. भद्रावती) हे दोघे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
 उपचारादरम्यान एकाचा मृत्यू 
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच स्वामी मलय्या यमलू यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष पवार याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित ट्रॅक्टर स्वप्नील बदकी (रा. महालगाव) यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
या अपघातानंतर शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जखमींना स्थानिक स्तरावर तातडीने उपचार मिळाले असते तर कदाचित जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. वेळेवर सुविधा मिळत नसल्याने जखमींना वरोरा किंवा चंद्रपूरला धाव घ्यावी लागते, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 विना नंबर वाहनांचा सुळसुळाट; आरटीओ झोपलेत का ?
शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर विना नंबर असलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली बिनदिक्कतपणे महामार्गावर धावत आहेत. परिवहन विभागाच्या (RTO) डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा बेजबाबदार वाहनधारकांमुळेच निष्पापांचे बळी जात असल्याने, आता तरी प्रशासन जागे होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या