Ticker

6/recent/ticker-posts

विनाक्रमांक सुसाट वाहनातून होतेय रेती वाहतूक..!

अर्थपूर्ण संबंधामुळे पोलिसांची बघ्याची भूमिका
 
पालांदूर येथील प्रकार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील हद्दीच्या लाखनी तालुक्यातून पुढे प्रवाहित होणाऱ्या चूलबंद नदी पात्रातील रेतीची बेसुमारपणे होणारी वाहतूक नविन मऱ्हेगाव,गोंदी, ढिवरखेडा मार्गे पालांदूर परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून रेती वाहतूक करणार्‍या एकाही ट्रॅक्टर व ट्रॉल्यांना नंबर नाहीत.सर्व ट्रॅक्टरांसह ट्रॉल्यांचे नंबर खोडून टाकले असून, या कामी महसूलसह पोलिस यंत्रणाही अर्थपूर्ण संबंधामुळे डोळेझाक करत असल्याने या दोन्हीही विभागाचे नेमके चालले आहे तरी काय?असा प्रश्न नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

पालांदूर येथील पोलीस ठाणे जवळून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर लाखांदूर तालुक्याची हद्द असून,लगतच चुलबंद नदीचे पात्र असल्याने या पात्रातील पाथरी येथून घरकूल बांधकामाकरीता लाखनी तहसील प्रशासनाने रेतीचा उपसा करण्याकरीता परवानगी दिली असली तरी या घाटातून उपसा करून वाहतूक करण्यात येत असलेल्या ट्रॅक्टरांसह चालक व मालकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांना डावलून मनमर्जीने रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घरकूल लाभार्थ्यांकरिता मोफत ५ ब्रास मिळालेल्या रेतीचा उपसा व वाहतुकीचा गैरफायदा घेऊन रेती तस्करांनी रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली असल्याचे चित्र आहे.रेतीच्या एकदाच काढलेल्या पासवर ४ ते ५ फेऱ्या मारत असल्याचा प्रकार सर्रास सुरूच असल्याचे दिसून येत आहे.हा सर्व प्रकार प्रशासनाच्या डोळ्यादेखत व सर्व विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीनेच केला जात आहे हे विशेष.



रेती तस्कर व पोलिस यंत्रणेची मिलिभगत तर नाही...!

पालांदूर परिसरातून वाहतूक करत असलेले हे सर्व ट्रॅक्टर पालांदूर पोलिस ठाण्यासमोरून तसेच येथील बाजार चौकातून राजरोसपणे वाहतूक करत आहेत.वाहन क्रमांकाच्या पाटीसाठी सर्वसामान्य चालकांना दंडीत केले जाते;मात्र एवढी मोठी वाहने पोलीस ठाण्यासमोरून तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या नजरेसमोरून अपडाऊन करीत असताना निदर्शनात येत नसतील तर पोलीस प्रशासनाचा उपयोग काय हा प्रश्नच आहे.
असे असूनही पोलिस यंत्रणा या विना क्रमांकाच्या रेती वाहतुकीवर कारवाई करण्यास कुचकामी ठरत असल्याने रेती वाहतूकदार व पोलिस यंत्रणेची मिलिभगत तर सुरू नाही ना अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.



तस्करांकडून रेती वाहतुकीवर लक्ष

रेती वाहतूक करणार्‍या एकाही ट्रॅक्टर व ट्रॉल्यांना नंबर नाहीत. सर्व ट्रॅक्टरांचे नंबर खोडून टाकले असून,रेती वाहतूक करणारे सर्वच ट्रॅक्टर इतक्या वेगाने चालतात की अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील कित्येक ट्रॅक्टरांच्या मालकाकडे छोट्या चारचाकी असून,ते वाहतूक होत असलेल्या मार्गावर दिवसा व रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी थांबून राहत आहेत.मोबाईलद्वारे एकमेकांशी संपर्क साधून गाडी पकडली जाणार नाही याची काळजी घेत आहेत.रेती भरून आलेल्या आपल्या गाडीपुढे २ किलोमीटरच्या अंतरावर पुढे-पुढे चालत असून, रेती वाहतूक करणार्‍या गाडीचालकाला वेळ पडल्यास मोबाईलद्वारे संपर्क करत असल्याने या कामी महसूल व पोलिस यंत्रणाही कशी फोल ठरेल,अशीही काळजी संबंधीत रेती तस्करांकडून घेतली जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या