भद्रावतीत संतप्त भाकपा कार्यकर्त्याचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : भद्रावती तहसील कार्यालयातील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या अकार्यक्षमता, वेळकाढूपणा व नागरिकांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या भाकपाच्या कार्यकर्त्याने प्रशासनाला थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कॉमरेड राजू महादेव गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना पाठवलेल्या निवेदनातून हा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित तहसीलदारांच्या निष्क्रिय कारभारामुळे तहसील कार्यालयातील कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामांसाठी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असून, अनेक महिने उलटूनही प्रकरणे मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वी परमेश मेश्राम या शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेनंतरही संबंधित तहसीलदारांनी कोणताही धडा न घेतल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गही या कार्यपद्धतीमुळे त्रस्त असून मानसिक तणावाखाली काम करत असल्याचे चित्र आहे. परिणामी संपूर्ण प्रशासन यंत्रणा निष्क्रिय झाल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, “आमच्या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष द्या, अन्यथा मला जीव देण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असा संतप्त इशारा देत गैनवार यांनी प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच पालकमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या असून आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या