न्याय न मिळाल्यास ६ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर:-राधानगरी तालुक्यातील गवशी येथील एका अनुसूचित जातीच्या सामान्य शेतकऱ्याची बँक आणि विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अन्यायाविरोधात 'पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना' आक्रमक झाली असून, पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी जाहीर केले आहे.
नेमके प्रकरण काय?
गवशी येथील शेतकरी श्री. शहाजी संभाजी कांबळे यांनी कोणतीही कर्जाची मागणी केलेली नसतानाही, १९ मे २०२२ रोजी त्यांच्या खात्यावर १,०९,२५० रुपये जमा करण्यात आले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी त्यांच्या कोणत्याही संमतीशिवाय किंवा स्वाक्षरीशिवाय १,२९,००० रुपये परस्पर काढून घेण्यात आले. हा सर्व प्रकार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा म्हासुर्ली) आणि श्री. खंडोबा विकास (वि.का.स.) सेवा संस्था यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
ऊसाचे ४ लाख रुपये हडपल्याचा आरोप
तक्रारदाराच्या कुटुंबातील ऊसाचे बिल, जे सुमारे ४,००,००० रुपये इतके होते, ते देखील या संस्थेने बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात वर्ग करून घेतले आहे. या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस अधीक्षक आणि निबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे संतप्त होऊन आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या:
१. म्हासुर्ली बँकेचे तत्कालीन मॅनेजर संभाजी शंकर पाटील, संस्थेचे चेअरमन सर्जेराव ज्ञानू पाटील व दोषी संचालक मंडळावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
२. ऊसाच्या बिलाची ४,००,००० रुपयांची रक्कम व्याजासह शेतकऱ्याला परत मिळावी.
३. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शासन व्हावे.
प्रशासनाला इशारा
"सामान्य शेतकऱ्याचे पैसे हडप करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. ६ एप्रिलला सकाळी १० वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होईल. उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल," असा इशारा पँथर आर्मीचे संस्थापक संतोष एस. आठवले आणि राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस नितेश कुमार दिशांत, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, बबन तांदळे आणि छाया सातारकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


0 टिप्पण्या