चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-फ्युचर पोदार लर्न शाळेत ग्रॅज्युएशन दिवस साजरा करण्यात आला.पूर्व प्राथमिक ग्रॅज्युएशन दिवस हा पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळेत इयत्ता १ जाण्यापूर्वीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या समारंभात बालवाडीच्या ३ वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले जाते, ज्यामध्ये मुले गाणी, डान्स आणि छोटा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हा दिवस मुलांच्या आत्मविश्वासात वाढ करतो. त्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक पोशाख परिधान करून सर्व विद्यार्थी मंचावर येताना त्यांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. शिस्तबद्ध रीतीने आपली पदवी कॅप्स घेण्यासाठी ही चिमुकली मोठ्या उत्साहाने मंचावर येत होती. प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तीन वर्षांच्या शिक्षण प्रवासाची एक चित्रफित दाखवण्यात आली. चित्रफित पाहून सर्व विद्यार्थी व पालकांच्या आठवणीना उजाळा मिळाला. संचालिका सौ. नमिता अजय तुमसरे व प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन प्रमाणपत्र, गौरवचिन्ह तसेच पदवी बहाल करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी लहान पदवीधारकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपल्या शुभेच्छापर मार्गदर्शन करतांना विचार मांडले. रेड लाईट ग्रीन लाईट, बिल्डिंग ब्लॉक्स यासारख्या विविध खेळ यावेळी लहान पदवीधारकांनी खेळले. शाळेच्या संचालिका सौ. नमिता अजय तुमसरे यांनी ही छोटी-छोटी पावलं आज मोठ्या टप्प्याकडे जात आहेत. कालपर्यंत आई-बाबांच्या हातात हात घालून चालणारी ही मुलं आज आत्मविश्वासाने पुढे जात आहेत, हे पाहून खूप आनंद वाटतो. असे मत प्रगट केले. प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी सांगितले की, या मुलांनी इथे खूप काही शिकलं – अक्षरं, अंक, गाणी, खेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगले संस्कार. त्यांच्या या प्रवासात शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे. पुढच्या वाटचालीत तुम्ही नेहमी आनंदी रहा, जिज्ञासू रहा आणि मोठी स्वप्नं पाहा. कार्यक्रमाचे संचालन समन्वक गरिमा हरदानीया केले तर आभार मीनल येळे यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या