Ticker

6/recent/ticker-posts

करमाळा: निळा झेंडा काढल्याप्रकरणी रिपाइं आक्रमक; भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 'ॲट्रॉसिटी ॲक्ट' अंतर्गत कारवाईची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी
 करमाळा:- येथील भीमनगर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला निळा झेंडा भेदभावपूर्ण पद्धतीने काढल्याचा आरोप करत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वतीने करमाळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त भीमनगर भागात निळा झेंडा लावण्यात आला होता. मात्र, प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी 'परवानगी नाही' असे कारण देत रात्री १:३० च्या सुमारास हा झेंडा काढून टाकला. विशेष म्हणजे, याच गावात इतर ठिकाणीही विविध प्रकारचे झेंडे लावलेले असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ निळा झेंडाच काढल्यामुळे प्रशासनाचा हा दृष्टिकोन पक्षपाती आणि सामाजिक समतेच्या विरोधात असल्याचा आरोप रिपाइंने केला आहे.

'ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा
रिपाइं (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश दादा कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जर ही कारवाई जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण भावनेतून केली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा दाखल होऊ शकतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

गावातील जुन्या वादाचा संदर्भ
या निवेदनात डिसेंबर २०२५ मधील एका घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी गावातील मारुती मंदिराजवळील पारावर झोपलेल्या दलित समाजातील व्यक्तीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. अशा घटनांमुळे गावात तणावाचे वातावरण असून प्रशासनाने पक्षपाती कारवाई करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आंदोलनाचा पवित्रा
जर या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर वेळेत कारवाई झाली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागेश कांबळे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या