Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडमध्ये वाढती गुन्हेगारी; पोलिस यंत्रणेवर नागरिकांचा प्रश्नचिन्ह


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड : शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चोरी, मारामाऱ्या, जुगार, मटका, सट्टा यांसारख्या गुन्ह्यांसोबतच वाळू माफियांची दादागिरीही उघडपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही काळात खून, गँगवॉर आणि सुपारी घेऊन हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही घटना भर रस्त्यावर घडत असून, पोलिस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे “आपण कितपत सुरक्षित आहोत?” असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे.
शहरात संशयित व्यक्तींची कसून तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हत्यारे जप्त होऊ शकतात, असे स्थानिकांचे मत आहे. पूर्वी चाकू, तलवारी यांसारखी हत्यारे बाळगणाऱ्यांची संख्या होतीच; मात्र आता पिस्तूलसारखी घातक शस्त्रे बाळगणारे गुन्हेगार खुलेआम फिरताना दिसत आहेत. यावरून पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा सुरू आहे.
याशिवाय, बालगुन्हेगारीतही वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. कमी वयातील युवक हत्यारे बाळगून फिरत असल्याने भविष्यात गंभीर गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, अशा प्रवृत्तीवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर हेच युवक पुढे कट्टर गुन्हेगार बनू शकतात.
दरम्यान, काही ठिकाणी गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून किरकोळ गुन्ह्यांवर कारवाई केली जाते, अशी टीकाही नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गरीब व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. अनेकदा तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांची मागणी आहे की, संवेदनशील भागात विशेष मोहीम राबवून संशयितांची कसून चौकशी करावी, बेकायदेशीर हत्यारे जप्त करावीत आणि बालगुन्हेगारीवर कठोर नियंत्रण ठेवावे. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलिस यंत्रणेला अधिक प्रभावीपणे कामाला लावावे.
नांदेड शहर सुरक्षित आणि गुन्हेगारीमुक्त ठेवण्यासाठी ठोस व कठोर उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या