Ticker

6/recent/ticker-posts

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक: 18 जूनला 977 मतदार ठरवणार आमदार

आदर्श आचारसंहिता लागू; चंद्रपूरचे 469, वर्ध्याचे 264, गडचिरोलीचे 244 सदस्य बजावणार मतदानाचा हक्क

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर, : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 18 जून 2026 रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य आहेत. त्यात चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य, 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतींचे 403 सदस्य समाविष्ट आहेत. वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे 264 सदस्य तर गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे 244 सदस्य मतदान करतील. विशेष म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या शून्य आहे.


या निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे एकूण 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.


18 मे पासून तिन्ही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.



-----------------------------------
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी! वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात 18 जूनला मतदान. 977 नगरसेवक ठरवणार आमदार. चंद्रपूर 469, वर्धा 264, गडचिरोली 244 मतदार. 17 मतदान केंद्रे, मतमोजणी चंद्रपुरात. आचारसंहिता लागू - जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या