Ticker

6/recent/ticker-posts

महर्षि चौकाचे तब्बल 2 कोटींच्या निधीतून होणार्‍या सुशोभीकरणाच्या कामास सुरूवात ; वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज : अकलूज शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या महर्षि चौकाच्या भव्य रूंदीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, शहराच्या सौंदर्यात आणि वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवून आणणारा हा प्रकल्प ठरणार आहे. अंदाजे 2 कोटी रुपयांच्या निधीतून अकलूजच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात येत आहे.

 माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजच्या नगराध्यक्षा रेश्मा अडगळे तसेच उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पाठपुरावा आणि प्रयत्न केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच या महत्त्वाच्या कामाला गती मिळाल्याची चर्चा शहरात होत आहे.

सध्या वाहतुकीचा मोठा ताण सहन करणारा महर्षि चौक आता तब्बल 55 बाय 44 मीटरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे चौक जवळपास दुप्पट मोठा होणार असून, भविष्यात होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अकलूज शहरातील विविध प्रमुख मार्ग या चौकातून जोडले जात असल्यामुळे हा चौक शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या प्रकल्पांतर्गत चौकाचे संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार असून, मजबूत आणि टिकाऊ बांधकामावर भर दिला जाणार आहे. रात्रीच्या वेळी चौक आकर्षक आणि सुरक्षित दिसावा यासाठी अत्याधुनिक एलईडी प्रकाशयोजना उभारण्यात येणार आहे. यासोबतच परिसरातील सर्व विद्युत वाहिन्या अंडरग्राऊंड करण्यात येणार असल्याने भविष्यात वारंवार होणारे खोदकाम टळणार असून शहराच्या सुशोभीकरणात मोठी भर पडणार आहे.

याशिवाय चौकाच्या मध्यभागी अकलूज नगरपरिषदेच्या माध्यमातून आकर्षक आणि भव्य स्तंभ उभारण्यात येणार आहे. हा स्तंभ भविष्यात अकलूज शहराच्या ओळखीचे नवे प्रतीक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आधुनिकता, सौंदर्य आणि सुटसुटीत वाहतूक यांचा उत्तम संगम या प्रकल्पातून पाहायला मिळणार आहे.

स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून, महर्षि चौकाबरोबरच गांधी चौक येथेही सुशोभीकरणाच्या कामास लवकरच सुरूवात होणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर अकलूज शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या