चारही आरोपींना अटक
साकोली पोलिसांचा सुपरफास्ट तपास
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : शुक्रवारी सकाळी तलावात युवकाचा मृतदेह आढळला होता. मृतक निखील राजकुमार कांबळे यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. यानंतर साकोली पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आधारे सखोल तपास सुरू करीत अवघ्या २४ तासात चार आरोपींना अटक केली. ही कारवाई शनिवार ( २३ मे ) रोजी करण्यात आली. यातील तीन आरोपी साकोलीचे व एक लाखनीचा असून चारहीआरोपी १९ ते २३ वयोगटातील युवक आहेत. शुक्रवार ता. २२ मे ला स. ६ वा. साकोलीच्या तलावात युवकाचा मृतदेह आढळला होता. यावर मृतक निखील राजकुमार कांबळे वय ३० ही ओळख पटली. मृतकाचे वडील राजकुमार कांबळे रा. मुरपार/लेंडेझरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आधारे चौफेर तपास सुरू केला. रात्रभरातून चार आरोपी गणेश मनोहर वलथरे २०, सागर शंकर पारधी १९, ओंकार सुनील मेश्राम २१ तिन्ही रा. शिवाजी वार्ड साकोली व कमलेश चुन्नीलाल कुकवास २३ रा. मानेगाव सडक ( लाखनी ) या चौघांना मोठ्या शिताफीने पळत्या वाटेवर पोलीसांनी वेगवेगळ्या जागून अटक केली आहे. मृतक निखील हा साकोलीत एका दारू दुकानात काम करीत होता. त्यावर डुग्गीपार ( गोंदिया ) पोलीसांत बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता. व १ महिन्यांपूर्वी जामिनावर तुरूंगातून सुटका होऊन आला होता. साकोलीत दारू दुकानात काम मिळाले म्हणून सांगत त्याची साकोलीत भाड्याने खोली घेतली होती. दि. २१ मे रोजी सायं. ५:३० ला मृतक निखील कांबळे व त्याचा मित्र गणेश वलथरे घरी ( मुरपार ) आला होता. व रात्री ८:३० ला पाण्याची कॅन सोबत घेऊन खोलीवर जातो म्हणून साकोलीला निघून गेला. काही वेळाने निखीलचा फोन वडीलांना आला पण निखीलचा आवाज येत नव्हता, फक्त भांडणे सुरू असल्याचा आवाज ऐकू आला व फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २२ मे रोजी स. ७:३० ला पोलीस ठाणे साकोलीतून वडीलांना करण्यात आला की शहरात एक मृतदेह आहे ती फोटो व्हॉट्सॲप वर पाठविली तर हा निखीलचाच मृतदेह आहे असे ओळखले. नंतर वडिलांनी माझ्या मुलास कोणत्यातरी धारदार शस्त्राने छातीवर, मानेवर व डोक्यावर भोसकून त्याचा खून केला आहे व जो सोबत मित्र आले होते यांनीच खून केला असे वडीलांच्या तक्रारीत नमूद केले आहे.
तातडीने तक्रारीवर साकोली पोलीसांनी आपली चमू अलर्ट करून सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेरांची फुटेज हाती घेतले. चौफेर तपास करून अवघ्या २४ तासात चारही आरोपींना विविध ठिकाणांहून पळत्या वाटेवर पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. यात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तायवाडे, सहा. पोलीस निरीक्षक राजू साळवे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक स्वप्निल गोस्वामी, चंद्रकांत थेर, नरेंद्र झलके, राहुल गायधने, महेश नैताम, गोविंद शिंदे, शिवा मरकाम यांनी विशेष कामगिरी करीत जलदगतीने आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले. आरोपींविरुद्ध भा. न्या. सं. ४५१/२६ कलम १०३ (१), ३ ( ५ ) नुसार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल असे तपास अधिकारींनी सांगितले.
-----------------------------------------------
त्या वेळेत नेमके काय झाले असावे ?
मृतक निखील कांबळे व मित्र गणेश वलथरे हे त्याच्या स्वगाव मुरपार लेंडेझरी वरून गुरू. २१ मे रात्री ८:३० ला बाईकनी दोघेजण निघाले. थोड्याच वेळात वडीलांना दुरध्वनी आला व भांडणाचा आवाज आला. साकोलीत रात्री किती वाजता पोहचले व यादरम्यान तीन आरोपी सागर पारधी, ओंकार मेश्राम व कमलेश कुकवास हे त्यांना कुठे मिळाले.? किंवा त्यांना फोन करून कुणी बोलविले ? नंतर ते एकाच दुचाकीवरून पाच जण गेले की अजून दुचाकी वाहन कुणाचे होते ? त्या घटनास्थळी मोबाईल संच सुद्धा फोडलेला मिळाला. म्हणजे चार आरोपींनी निखीलला तलावात आणून खून केला की, अन्य जागी नेऊन भोसकले ? हा संशोधनाचा विषय आहे. कारण मृतदेह आढळला तेथे रक्ताचे अवशेष आढळले नाही. याचा सुगावा साकोली पोलीस लावत आहेत. सध्या चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयात हजर केले जाईल.


0 टिप्पण्या