Ticker

6/recent/ticker-posts

तडाली मार्गावर डिझेल माफियांचा सुळसुळाट;


 हॉटेलच्या आडून काळाबाजार, पोलीस प्रशासनाचे  दुर्लक्ष?


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : तालुक्यातील तडाली मार्ग सध्या अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू ठरत आहे. तडाली टी-पॉइंट आणि गोपानी कारखान्यासमोरील मुख्य रस्त्यावर 'हॉटेल'च्या नावाखाली हजारो लिटर डिझेलचा काळाबाजार उघडपणे सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य रस्त्यावरच हे अवैध अड्डे फोफावले असताना पडोली पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

या मार्गावरून धावणाऱ्या जड वाहनांमधून डिझेलची चोरी करून ते कमी किमतीत विकणारी मोठी साखळी येथे सक्रिय आहे. ढाब्यांच्या आडोशाने चालणाऱ्या या काळ्या धंद्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळत आहे. अनेक महिन्यांपासून हे रॅकेट निर्भयपणे सुरू असल्याने पडोली येथील सहाय्यक पोलीस
निरीक्षकांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर संशयाची सुई रोखली जात आहे.

केवळ डिझेल माफियाच नव्हे, तर याच परिसरात दोन ते तीन ठिकाणी अवैध देशी दारूची विक्री सर्रास सुरू आहे. औद्योगिक क्षेत्र असल्याने या मार्गावर ट्रकची मोठी वर्दळ असते. चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याने निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वाढत्या अपघातांना हे अवैध दारू विक्रीचे केंद्र जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

"प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. अवैध डिझेल विक्री तात्काळ बंद करून दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या