ग्राहक पंचायतच्या तक्रारीनंतर चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांनी ठोकला दंड; अशोक शेंडेंना मिळाला न्याय
राजेश येसेकर चित्रा न्युज
भद्रावती: "छापील किंमतीपेक्षा एक रुपयाही जास्त घेऊ नका" हा नियम पायदळी तुडवणाऱ्या शहरातील समाधान पुर्ती सुपर बाझार वर वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर कडून धडक कारवाई करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेकडे तक्रार जाताच अवघ्या 10 दिवसांत कारवाई झाली.
शहरातील ग्राहक अशोक शेंडे यांनी दि. 29 मे रोजी समाधान पुर्ती सुपर बाझारमधून किराणा सामान खरेदी केले. त्यात एक लिटरचे ऑलीव्ह ॲक्टीव्ह ऑईल घेतले. पॅकेटवर छापील किंमत 255 रुपये स्पष्ट असतानाही बिलात 275 रुपये आकारण्यात आले. म्हणजे 20 रुपये जादा घेतल्याचा प्रकार समोर आला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक शेंडे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांच्याशी संपर्क करून लेखी तक्रार दिली. तक्रार मिळताच ग्राहक पंचायतने तत्काळ हे प्रकरण वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर कडे पाठवले.
*वैधमापन विभागाचा दणका:*
उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुनिल वाडे यांनी दि. 8 जून रोजी सुपर बाझारवर धडक दिली. वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व पॅकेज्ड कमोडिटीज नियम 2011 च्या कलम 18(2) नुसार छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी समाधान पुर्ती सुपर बाझारवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्राहक अशोक शेंडे म्हणाले:
"20 रुपये मोठी रक्कम नाही, पण हा ग्राहकाच्या हक्काचा प्रश्न होता. ग्राहक पंचायत आणि वैधमापन विभागामुळे न्याय मिळाला. सर्वांचे आभार."
____________________________________
MRP पेक्षा जादा दर घेणाऱ्यांना दणका!
भद्रावतीच्या 'समाधान पुर्ती सुपर बाझार'वर वैधमापन विभागाची कारवाई. ऑलिव्ह ऑईलवर MRP 255 रुपये असताना ग्राहक अशोक शेंडेंकडून घेतले 275. ग्राहक पंचायतच्या तक्रारीनंतर 10 दिवसांत कारवाई. वैध मापन अधिनियम 2009 नुसार गुन्हा दाखल.
-


0 टिप्पण्या