चेक बाऊन्स करणाऱ्या वाहनमालकाला कायदेशीर कारवाईची भीती; भद्रावतीच्या अन्सारींना मिळाला न्याय
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती: "ग्राहक पंचायत म्हणजे सामान्यांचा आधार" हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक इस्तियाक अन्सारी यांची तब्बल एक वर्षाहून अधिक काळ अडकलेली 60 हजार रुपयांची रक्कम ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेच्या प्रभावी मध्यस्थीमुळे अवघ्या 15 दिवसांत परत मिळाली आहे.
इस्तियाक अन्सारी यांचे शहरात चारचाकी वाहनांच्या डेंटिंग-पेंटिंगचे वर्कशॉप आहे. एका वाहनधारकाने दि. 19 एप्रिल 2025 रोजी स्कॉर्पिओ वाहनाचे डेंटिंग-पेंटिंगचे काम करून घेतले. काम पूर्ण झाल्यावर 68,500 रुपयांचे बिल न भरताच 'नंतर देतो' असे सांगून वाहन ताब्यात घेतले. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळाले नाहीत. दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी दिलेला धनादेशही बाऊन्स झाला. त्यामुळे अन्सारी यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
शेवटी अन्सारी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पंचायतीने तत्काळ वाहनमालकाशी संपर्क साधला. "चेक बाऊन्स होणे हा गंभीर गुन्हा असून कारावास, दंड आणि व्याजासह रक्कम परत करावी लागू शकते" याची कायदेशीर जाणीव करून देताच संबंधित व्यक्ती नरमली आणि संपूर्ण रक्कम परत करण्याचे मान्य केले.
संबंधित व्यक्तीने थकीत 60 हजार रुपयांची रक्कम ग्राहक पंचायतच्या विशेष बैठकीत जमा केली. दि. 6 जून रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य व विदर्भ प्रांत कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत ही रक्कम इस्तियाक अन्सारी यांना सुपूर्द करण्यात आली. उर्वरित 8,500 रुपये सात दिवसांत देण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले.
यावेळी राज्य सचिव अरूण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्य कार्यकारी सदस्य चंद्रकांत डागा, विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत सचिव लिलाधर लोहरे, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, भद्रावती शाखेचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार यांच्यासह करूणा मोघे, भारत खोब्रागडे, सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे, रवी भांडारकर, नामदेव रामटेके आणि प्रतिक्षा बनकर उपस्थित होते.
इस्तियाक अन्सारी म्हणाले:
"वर्षभर हेलपाटे मारूनही पैसे मिळत नव्हते. ग्राहक पंचायतमध्ये तक्रार करताच 15 दिवसांत न्याय मिळाला. सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार.
--------------------------------------------
💰 _भद्रावतीत ग्राहक पंचायतचा करिश्मा!_
1 वर्षापासून थकलेले 60 हजार रुपये 15 दिवसांत वसूल. डेंटिंग-पेंटिंगचे बिल न देणाऱ्या व चेक बाऊन्स करणाऱ्या वाहनमालकाला ग्राहक पंचायतने सुनावले. कायदेशीर कारवाईच्या भीतीने तात्काळ 60 हजार परत. उर्वरित 8,500 सात दिवसांत देणार. व्यावसायिक इस्तियाक अन्सारींना मिळाला न्याय.


0 टिप्पण्या