Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव पोलिसांचे "ऑपरेशन ड्रॉप केस" यशस्वीमुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांवर पहाटेची धडक कारवाई; 55 सराईत आरोपी ताब्यात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
जळगाव:- मुक्ताईनगर तालुक्यातील "ड्रॉप केस" प्रकारच्या फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाच गावांवर जळगाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करत "ऑपरेशन ड्रॉप केस" हे विशेष अभियान राबविले. पोलिसांच्या मते, ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी "सर्जिकल स्ट्राइक" ठरली आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये अनेक वर्षांपासून विशिष्ट प्रकारच्या फसवणूक आणि लूटमारीच्या घटना घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गावांमधून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे तपासात उघड झाले.
आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
व्हिडिओंना भुलून गावात पोहोचलेल्या व्यक्तींना बनावट नोटा, खोट्या मौल्यवान वस्तू किंवा नकली साहित्य दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा कोणतीही वस्तू न देता थेट पैसे हिसकावून घेतले जातात. विरोध करणाऱ्यांना मारहाण करून लुटल्याच्याही घटना घडल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणांमध्ये पीडितांच्या जवळ बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रीत केले जातात. त्यानंतर "पोलिसांकडे तक्रार केल्यास वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू" अशी धमकी देऊन त्यांना गप्प बसवले जाते. पोलिसांच्या भाषेत या प्रकारांना "ड्रॉप केस" असे संबोधले जाते.
गुन्हेगारीची चिंताजनक आकडेवारी
मागील तीन वर्षांत या परिसरात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये 10 दरोडे, 1 खुनासह दरोडा, 1 खून, 7 जबरी चोरी, 16 फसवणुकीचे गुन्हे, 1 दरोड्याचा प्रयत्न तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवरील 2 हल्ल्यांचा समावेश आहे.
मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त
या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष नियोजन करून पहाटे एकाच वेळी पाचही गावांमध्ये धाडसत्र राबविले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित व सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
रोख रक्कम – अंदाजे ₹20 लाख
सोने – अंदाजे 300 ग्रॅम
चांदी – अंदाजे 2.5 किलो
हरणाची कातडी – 2
चिल्ड्रन्स बँक करन्सी
कलर प्रिंटर
नागमणी, रुद्राक्ष, रेड मर्क्युरी बल्ब, सुलेमानी दगड
मोबाईल हँडसेट – 30
जप्त वाहने :
चारचाकी वाहने – 4
दुचाकी वाहने – 6
शस्त्रे :
गावठी कट्टा – 1
चॉपर – 2
या कारवाईदरम्यान एकूण 55 रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे. या विशेष मोहिमेमुळे मुक्ताईनगर परिसरातील संघटित फसवणूक आणि गुन्हेगारी कारवायांना मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या